खा. संजय राऊत यांना चांद्रयानातून चंद्रावर पाठवले
असते तर महाराष्ट्र शांत झाला असता आमदार शहाजी पाटील
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सर्वात मोठी चूक केली आहे. त्यांनी चांद्रयानातून खासदार संजय राऊत यांना चंद्रावर सोडायला हवे होते
सांगोला - देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सर्वात मोठी चूक केली आहे.
त्यांनी चांद्रयानातून खासदार संजय राऊत यांना चंद्रावर सोडायला हवे होते. खासदार राऊतांना चंद्रावर पाठविले असते तर महाराष्ट्रातील राजकारण शांत झाले असते.
दररोजची किरकिर बंद झाल्या असती असा उपरोधिक टोला आमदार शहाजी पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला.
सांगोला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आले होते.
भूमिपूजन सोहळ्यानंतर सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी पत्रकाराशी संवाद साधताना संजय राऊत यांच्याविषयी बोलत होते.
राज्यात गतवर्षी झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिवसेना शिंदे गटाचे
आमदार शहाजी पाटील यांच्यातील वाकयुद्ध काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही.
पुढे बोलताना आमदार शहाजी पाटील म्हणाले, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अजूनही देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना साथ द्यावी.
अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी याबाबत विचार करावा असेही यावेळी शहाजीबापूंनी नमूद केले.
२०१९ च्या सत्तांतरातही आम्हाला एकामागे एक असे चार वेगवेगळ्या हॉटेलमधे घेऊन जाण्यात आले होते.
परंतु याबाबत आम्ही वाच्यता करणार नाही. उध्दव ठाकरे यांनी आम्हाला डांबून ठेवण्याची भाषा करू नये,
त्यांनीच जर स्वतःला घरात डांबून ठेवले नसते तर आज ही वेळच आली नसती अशा शब्दात आमदार पाटीलांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
गतवर्षी झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत हे नेहमीच आमदार शहाजीबापूंच्या रडारवर राहिले आहेत.
खासदार राऊत दररोज पत्रकार परिषद आणि अन्य माध्यमातून वादग्रस्त वक्तव्य करून राज्यात अशांतता निर्माण करत आहेत. त्यांच्या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्र त्रस्त आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात सोडलेल्या चांद्रयान - ३ मध्ये त्यांना बसवून चंद्रावर सोडले असते तर राज्यातील किरकीर बंद झाली असती.
संपूर्ण राज्य शांत झाले असते असा उपरोधिक टोलाही शेवटी आमदार शहाजी पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला.


0 Comments