धक्कादायक प्रकार..सोलापूर : मुलास शिक्षणासाठी का पाठवले या कारणाने पतीनेच केला पत्नीचा खून
करमाळा येथे मुलास शिक्षणासाठी मामाकडे का पाठवले या कारणास्तव पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.उमा प्रफुल्ल पवार (वय 32 रा.फंड गल्ली ता. करमाळा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
तर प्रफुल्ल विठ्ठल पवार (वय 41) असे संशयित खुनी आरोपीचे नाव आहे. दादा मारूती चव्हाण (वय 35 रा. लऊळ तालुका माढा हल्ली मुक्काम सुंदर नगर, मोहोळ) या महिलेच्या भावाने करमाळा पोलिसांत या घटनेची फिर्याद दिली.
याबाबतची माहितीअशी की, मयत उमा पवार महिलेने त्यांचा मोठा मुलगा महेश याला तीन वर्षांपूर्वी मामाकडे शिक्षणासाठी मोहोळ येथे पाठवले होते. या कारणावरून पती प्रफुल्ल हा सातत्याने दारू पिऊन विवाहिता उमा व महेश याला नेहमी शिवीगाळ करत होता.
पत्नीला सतत मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देत होता. लोकांच्या दारात का मुलाला पाठवते म्हणून छळ करत होता. दरम्यान नागपंचमीनिमित्त मुलगा करमाळ्यामध्ये आला होता.
यावेळी ही प्रफुल्ल पवार याने पत्नी उमा व मुलगा महेश याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. मुलाच्या पश्चात शुक्रवारी (दि. २६) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी प्रफुल्ल पवार याने एका धारदार शस्त्राने पत्नी उमा हिच्या डोक्यामध्ये मारहाण करून जबर जखमी केले.
यावेळी गंभीर जखम होऊन डोक्यातुन रक्तस्राव झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती मुलांना मिळताच मुले ही घरी आली. याबाबत आई मयत झाल्याचे पाहुन याबाबत वडिलांना विचारले असता पत्नी उमा हिने स्वत: जीवन संपवल्याचे सांगितले.
मात्र यावेळेस जखमी उमा या बाथरूम जवळ पडल्याचे मुलांनी पाहिल्याने याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान मयताचे भाऊ दादा चव्हाण हे घटनास्थळी आले. त्यांनी उमाने जीवन संपवले हे खोटे असल्याचे सांगितले. तसेच डोक्याला मोठी जखम झाल्याने तिचा कोणत्या तरी धारदार शस्त्राने खून केल्याची फिर्याद पोलिसांत दिली आहे.
दरम्यान करमाळा पोलिसांनी संशयित आरोपी प्रफुल्ल विठ्ठल पवार याला अटक केली असुन सहाय्यक पोलीस निरीक्षक एम एन जगदाळे हे तपास करत आहेत.
0 Comments