धक्कादायक माहिती... वाळू माफियांचा मस्तवालपणा ! जिल्हाधिकारी यांनाच ठार करण्याचा प्रयत्न
वाळू माफियांची मस्ती काही नवी नाही परंतु आता थेट जिल्हाधिकारी यांनाच ठार करण्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर - धुळे रस्त्यावर घडला असून चार किलोमीटर पर्यंत हा जीवघेणा थरार सुरु होता. या घटनेने पुन्हा एकदा वाळू चोरांची मग्रुरी समोर आली आहे.
वाळू तस्कर वाळूच्या पैशावर उन्मत्त झाले असल्याच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत. परंतु आता तर थेट जिल्हाधिकारी यांना मारण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे.
या घटनेतून महिला जिल्हाधिकारी सुदैवाने बचावल्या आहेत परंतु त्यांचा अंगरक्षक मात्र जखमी झाला आहे. वाळू चोरीचा धुमाकूळ राज्यभर सुरु आहे, राज्य शासनाने वाळूचे नवे धोरण आणले आहे
पण त्यालाही वाळू माफिया अडचणी आणत आहेत. सामान्यांना स्वस्त दरात वाळू देणारे हे धोरण राज्यात सुरु झाले आहे पण अनेक जिल्ह्यात अद्याप हे धोरण प्रत्यक्षात पुढे सरकले नाही. कमी दरात वाळू मिळणार म्हटल्यावर बांधकाम करू इच्छिणारे आनंदी झाले आहेत आणि या स्वस्त वाळूची प्रतीक्षा करीत आहेत.
वाळू तस्करांचा विरोध मोडून काढून वाळू धोरण राबवले जाईल असे महसूल मंत्री सांगत आहेत आणि लोकही या वाळूची वाट पहात आहेत. वाळू चोरांचे कंबरडे या धोरणाने मोडेल अशी अपेक्षा आहे पण त्यांची मुजोरी अधिकच वाढत चालली असल्याचे दिसून येऊ लागले आहे.
वाळू चोरांवर कारवाई करण्याच्या प्रयत्नात असलेल्या बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या अंगावर वाळूचा टिपर घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न वाळू तस्करांनी केला आहे.
छत्रपती संभाजी नगरकडून बीडच्या दिशेने येत असलेल्या वाळू चोरांवर कारवाई करण्याचा धाडसी प्रयत्न जिल्हाधिकारी मुधोळ यांनी केला.
सोलापूर - धुळे महामार्गावर गेवराईजवळ वाळूचा टिपर वाळू वाहतूक करीत असल्याचे त्यांच्या निदर्शानास आले.
या टिपरवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या गाडीने या टिपरचा पाठलाग सुरु केला. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ आणि अंगरक्षक अंबादास तावणे हे या टिपरच्या मागे लागले होते.
मस्तवाल टिपरचालक त्यांना दाद द्यायला तयार नव्हता. जवळपास चार किमी अंतरापर्यंत हा थरार सुरुच होता. जिल्हाधिकारी यांच्या गाडीने टिपरला ओव्हरटेक केले.
त्यानंतर वाळू चोरांची मुजोरी आणखी वाढली आणि त्याने जिल्हाधिकारी यांच्या अंगावर टिपर घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
अत्यंत थरारक घटनेत आणि धाडसी कारवाई सरकारी अधिकारी यांचा जीव जाण्याची वेळ आली होती परंतु या घटनेतून सुदैवाने आणि थोडक्यात जिल्हाधिकारी बचावल्या आहेत.
त्यांचे अंगरक्षक मात्र या घटनेत जखमी झाले आहेत. या घटनेनंतर प्रचंड खळबळ उडाली आणि पोलीस यंत्रणेची धावाधाव झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून टिपर चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत
पण वाळू चोरीचा मूळ सूत्रधार मात्र मोकाट सुटला आहे. वाळू उपसा आणि चोरी हे प्रकार नित्याचेच झाले आहेत आणि यावर महसूल प्रशासनाकडून कारवाई देखील केली जाते. मात्र, ही कारवाई केवळ तात्पुरत्या स्वरूपात असते.
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी पदभार घेतल्यानंतर त्या सुरुवातीपासूनच वाळू माफीया त्यांच्या 'निशाण्यावर' आहेत. त्यांच्या कारवाईच्या धडाक्यामुळे वाळू चोर अस्वस्थ आहेत आणि अशातच या घटनेमुळे प्रशासनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठी, मंडलाधिकारी यांच्या अंगावर वाहने घालण्याचे प्रकार आधीही घडले आहेत. तहसीलादाराना देखील या मुजोरीचा फटका बसलेला आहे पण, आता थेट
जिल्हाधिकारी यांनाच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे परिसरात आणि महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. वाळू चोरांची मस्ती कुठपर्यंत गेली आहे हेच या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.


0 Comments