google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी... फडणवीसांनंतर अजित पवारही सोलापूरच्या दौऱ्यावर : काँग्रेस, भाजपनंतर राष्ट्रवादीतही राजकीय घडामोडींना वेग

Breaking News

मोठी बातमी... फडणवीसांनंतर अजित पवारही सोलापूरच्या दौऱ्यावर : काँग्रेस, भाजपनंतर राष्ट्रवादीतही राजकीय घडामोडींना वेग

मोठी बातमी... फडणवीसांनंतर अजित पवारही सोलापूरच्या दौऱ्यावर :


काँग्रेस, भाजपनंतर राष्ट्रवादीतही राजकीय घडामोडींना वेग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात सोलापूर शहराचा दौरा केला. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार हे येत्या गुरुवारी (ता. १ जून) सोलापूर शहर व जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधील या दोन दिग्गज नेत्यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कर्नाटक निवडणूक निकालानंतर लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या घडामोडी घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे दौरे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारे ठरत आहेत.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरचा मुक्कामी दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी पंढरपूर, सांगोला व सोलापूर शहरातील कार्यक्रमांना हजेरी लावून जिल्ह्यातील राष्ट्रवादीत उत्साह निर्माण केला हेाता. त्यांच्या या दौऱ्यात सोलापूर लोकसभा मतदार संघाबाबत चाचपणीही झाली होती. 

पवारांच्या दौऱ्यानंतर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत सोलापुरात मेळावा घेतला. या मेळाव्याने काँग्रेसची वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला. पण, तो अंतर्गत रुसव्याफुगव्यांनीच जास्त गाजला.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापू्रचा दौरा केला. बावकुळेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनीही सोलापुरात हजेरी लावून शासकीय कार्यक्रमांसह भाजपचा मेळावा घेतला. कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सोलापुरात येऊन भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. 

सोलापूरच्या राजकारणातील प्रमुख तीन पक्षांचे वरिष्ठ नेते सोलापुरात येऊ लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक तयारीचा उत्साह संचारू लागला आहे.

दरम्यान, माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव डॉ. पृथ्वीराज यांच्या विवाह सोहळ्याच्या स्वागत समारंभासाठी तसेच एका खासगी कार्यक्रमानिमित्त पवार सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. 

त्यांच्या या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही राजकीय कार्यक्रम नसला तरी अजितदादांना (Ajit Pawar) भेटण्यासाठी शहर आणि जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यावेळी राजकीय जोडण्या आणि राजकीय संदेश दिला जाऊ शकतो.

भाजपकडून माढा, सोलापुरात लोकसभेची तयारी सुरू

माढा आणि सोलापूर लोकसभा मतदार संघ पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने ग्राऊंडवर जाऊन तयारी सुरू केली आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, उपमुख्यमंत्री फडणवीस, कामगारमंत्री खाडे यांनी कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन येथील अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. 

माढा लोकसभा मतदार संघात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी माढा मतदार संघातील प्रमुख तालुक्यांचा दौरा केला आहे. या दौऱ्यांमुळे भाजपचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत.

Post a Comment

0 Comments