सांगोल्याचा पॅटर्नच वेगळा! शेकापची अग्नीपरिक्षा, बापूंचा शब्द, आबांची लोकसभा
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष शेकाप सोबत असतानाही बंड करून शहाजी बापूंना पाठिंबा देवून विजयाचा मार्ग सुकर केला होता.
हे सर्व करण्याच्या बदल्यात शहाजीबापू पाटील यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दीपकआबा साळुंखे पाटील यांना मदत करून निवडून आणण्याचा शब्द दिल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात ही चर्चा घडताना दिसत आहे.. मात्र निवडणुकीत दिलेले शब्द नेहमी पाळले जातातच असे नाही.
मात्र तरीही राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता ते आक्रमक झाले तर दिपकआबा साळुंखे पाटील हे निवडणुकीच्या आखाड्यात दंड थोपटून उभे राहू शकतात.
येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यानंतर काही महिन्यांतच विधानसभा आणि लोकसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.
आ.शहाजीबापूंनी आतापासूनच २०२४ विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीय…
माजी आ. दिपकआबांची लोकसभेसाठी चाचपणी सुरू असल्याचे दिसून येत असले तरी ऐनवेळेस दीपकआबा हे सांगोला विधानसभेच्या आखाड्यात दंड थोपटून उभे राहू शकतात..
तर दुसरीकडे भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात पक्षाचा बालेकिल्ला टिकवून ठेवण्यासाठी सुरू असलेली शेकापची अग्नीपरिक्षा या घडामोडींनी वेग घेतला आहे.
हे सर्व सुरू असतानाच आणखी एका चर्चेने खळबळ उडवून दिली आहे ती म्हणजे शहाजीबापूंनी मागील विधानसभा निवडणुकीत दीपकआबांना दिलेला शब्द…
सांगोल्याचा पॅटर्नच वेगळा!
संपूर्ण देशभरासह राज्यात भाजप विरोधात मतविभागणी टाळून एकास एक लढत व्हावी म्हणून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व इतर नेते विरोधकांची एकी करून वज्रमूठ बांधत असताना सांगोला तालुक्यात मात्र वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे.
राज्यातील प्रमुख पक्षाचे नेते मिळून मिसळून राजकारण करत असल्याचे दिसून येत आहेत. नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत हे उघडपणे दिसून आले आहे.
शेकापची मुसद्देगिरी, मात्र खदखद त्रासदायक
सांगोला तालुक्यात आ.गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्षाने तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक, विविध कार्य.सोसायटी निवडणूक,
सूतगिरणी, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, दूध संघ आदी निवडणुकीत डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपला वरचष्मा असल्याचे सिद्ध केले आहे.
या सर्व निवडणुकांत डॉ. बाबासाहेब देशमुख यांची राजकीय मुसद्देगिरी दिसून आली असली तरी शेकाप पक्षांतर्गत सुप्तपणे सुरू असलेली खदखद शेकापला डोखेदुखी ठरणार आहे. कोळा जि.प. गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी उघडपणे
शेकापला शिंगावर घेतले आहे. ही अंतर्गत खदखद थोपवण्यात डॉ. बाबासाहेब देशमुख किती यशस्वी होतात त्यावर बरीच राजकीय गणिते अवलंबून आहेत.
बापू – आबांची एकी
आ.शहाजीबापू पाटील व माजी आ.दिपकआबा साळुंखे यांनी शेकाप विरोध कायम ठेऊन वेळप्रसंगी सह.संस्थेत शेकाप बरोबर आघाडी करून काही
ठिकाणी निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयोग यशस्वी केला असला तरी येणाऱ्या काळात याचा राजकीय फायदा कोणास होतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
सांगोला मतदारसंघात शेकापचे आ.गणपतराव देशमुख,विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्यातच अनेक वर्षे सरळ लढत झाली आहे.
बापूंनी कोणता शब्द दिला?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष शेकाप सोबत असतानाही बंड करून शहाजी बापूंना पाठिंबा देवून विजयाचा मार्ग सुकर केला होता.
हे सर्व करण्याच्या बदल्यात शहाजीबापू पाटील यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दीपकआबा साळुंखे पाटील यांना मदत करून निवडून आणण्याचा शब्द दिल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात ही चर्चा घडताना दिसत आहे.. मात्र निवडणुकीत दिलेले शब्द नेहमी पाळले जातातच असे नाही.
मात्र तरीही राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता ते आक्रमक झाले तर दिपकआबा साळुंखे पाटील हे निवडणुकीच्या आखाड्यात दंड थोपटून उभे राहू शकतात.
बापूंची तयारी
भाजप-शिवसेनेकडून आ.शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यात केलेल्या विकास कामाच्या जोरावर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु केली असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभेसाठी आबा?
राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा लोकसभा निवडणुकीसाठी माजी आ.दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे निवडणूक निहाय तालुक्यातील राजकीय पक्षांची व्यूहरचना सतत बदलत जाणार असल्याचे दिसून येते.
भाजपचे तालुका अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी तालुक्यात बूथ कमिट्या सक्षम करण्यावर भर दिला असून त्यांच्या मागे युवकांची भक्कम फळी असल्याने पक्षाने संधी दिल्यास संधीचे सोने करण्यासाठी सदैव तयार असल्याची चर्चा आहे.
भाजपचे नेतृत्व नेहमी भाकरी फिरवीत असते जुन्या, नव्यांचा मेळ करून युवा चेहऱ्यांना संधी देत असते. त्यामुळे ते तालुक्यासाठी लंबी रेस का घोडा असणार आहेत.
सांगोला तालुक्याचा विचार केल्यास दोन वेळचा अपवाद वगळता शेकापचे गणपतराव देशमुख यांनी नेतृत्व केले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत सतत अवर्षणग्रस्त व दुष्काळी असलेल्या
सांगोला तालुक्याचा विकास करण्यासाठी सतत संघर्ष करून वेळप्रसंगी आंदोलने, मोर्चे काढून तत्कालीन सरकारला जाब विचारून तालुक्याच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे.
कै.नागनाथअण्णा नायकवडी व आ. गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे झालेल्या पाणी संघर्ष चळवळीमुळे टेंभू,म्हैसाळ योजनेतील कामासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी,तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने या योजनांचा सूक्ष्म सिंचन योजनेत समावेश करून कोट्यवधी रू.चा भरीव निधी दिला.
त्यामुळे तालुक्यास वरदान ठरणाऱ्या टेंभू म्हैसाळ योजना पूर्ण झाल्या. याचे संपूर्ण श्रेय फक्त गणपतराव देशमुख यांनाच असल्याचे स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी जाहीररीत्या सांगितले आहे.
त्यामुळे सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठीचे आ.गणपतराव देशमुख यांचे योगदान विसरता येणार नाही.
आ.देशमुख यांच्या निधनानंतर तालुक्यात झालेल्या सर्वच निवडणुकीत भाई चंद्रकांत देशमुख, डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेकाप आगेकूच करताना दिसून येत आहे.
सांगोला मतदारसंघात १९९० ते २०१४ या सहा विधानसभा निवडणुकीत शेकापचे आ.गणपतराव देशमुख व शहाजीबापू पाटील यांच्यातच थेट लढत झाली. यामध्ये पाच वेळा गणपतराव देशमुख हे कमीत कमी १० ते ४० हजारच्या फरकाने निवडून आले
तर शहाजीबापू पाटील हे १९९५ च्या.निवडणुकीत काँग्रेस कडून फक्त १९२ तर २०१९ विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून ६७२ मताच्या फरकाने निवडून आले होते.
म्हणजेच विधानसभा निवडणुकीत शेकापचा उमेदवार १० हजार पेक्षा जास्त मताने निवडून येतो तर शेकापचाच उमेदवार पराभूत होताना थोड्याच मताने पराभूत होतो हे आकडेवारीवरून दिसून येते.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वयोमानामुळे आम. गणपतराव देशमुख यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता व्यक्त केली. या निवडणुकीसाठी शेकापक्षाने पक्षातील भाऊसाहेब रुपनर यांना उमेदवारी जाहीर केली.
पण या जाहीर केलेल्या उमेदवारास पक्षांतर्गत विरोध झाल्याने शेकापक्षास आपला उमेदवार ऐनवेळी बदलावा लागला. आ. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ.अनिकेत देशमुख यांना ऐनवेळी विधानसभेसाठी अर्ज भरण्यास सांगितले गेले.
त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. दीपकआबा साळुंखे पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आघाडीधर्म न पाळता स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केला.
तसेच कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी न घेता शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला होता.
तर राष्ट्रवादीच्या भाळवणी गटातील एकनिष्ठ राष्ट्रवादी नेत्यांनी शेकापचे उमेदवार डॉ.अनिकेत देशमुख यांना पाठिंबा दिला होता.
शेकाप विरोधात तालुक्यातील सर्व विरोधक एकत्र आल्याने शेकाप उमेदवाराचा पराभव झाला व आ. शहाजीबापू पाटील निवडून आले. त्यानंतर तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुक,विविध कार्य.
सोसायटी निवडणूक,शेतकरी सूतगिरणी,खरेदी विक्री संघ,मार्केट कमिटी,दूध संघ, औद्योगिक संघ आदी निवडणुकीत शेकापने आपले बहुमत सिद्ध केले आहे.
गेल्या वर्षी शिवसेनेत बंड झाल्याने शिवसेनेचे आ.शहाजी पाटील यांनी शिंदे गटात सहभागी झाले व त्यांनी राज्यात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. सध्याच्या राजकारणात काहीही घडू शकते.
राजकारणात कायमचे मित्रत्व आणि शत्रुत्व नसते असे म्हटले जाते. राजकीय स्वार्थापोटी वेगवेगळ्या पक्षातील नेते एकत्र येतात आणि त्यातून संधीसाधू युती,आघाडी जन्माला येते.
याचाच प्रत्यय अलीकडेच पार पडलेल्या सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आला. या निवडणुकीत झालेली यूती ही या निवडणुकीपुरतीच मर्यादित होती असे हे नेते आता सांगत आहेत.
आगामी काळात सध्या लांबणीवर पडलेल्या मात्र अटळ असलेल्या नगरपरिषद,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.
यातील बहुतांश निवडणुका देखील स्थानिक पातळीवरील राजकीय स्थिती पाहून लढवल्या जातात. या पार्श्वभूमीवर आगामी काळात नेमके काय घडेल ते पाहणे ओत्सुक्याचे ठरेल.


0 Comments