संतापजनक... राजकीय पुढाऱ्यांनो, आमच्या गावात फिरकायचं न्हाय !
आमदार असो नाहीतर खासदार, 'राजकारणातल्या पुढाऱ्यांनो, आमच्या गावात फिरकायचं न्हाय'! अशी तंबी देत एका गावाने सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी केली आहे. निवडणुकीच्या काळात काही गावात असे प्रकार पाहायला मिळतात पण हा प्रकार वेगळ्याच संतापातून आलेला आहे.
कुठलीही निवडणूक आली की, गावात राजकीय पुढारी गर्दी करू लागतात, आम्ही तुमच्यासाठी हे करू आणि ते करू, अशा बाता मारल्या जातात आणि निवडणूक झाली की पुन्हा या जनतेला कुत्रेही विचारत नाही. असा सर्वसाधारण अनुभव आहे. निवडणूक ग्राम पंचायतीची असो की विधानसभा, लोकसभेची असो.
आश्वासनांची खैरात करीत पुढारी गावातून फिरत असतात, त्यांचे स्पीकर रस्त्यारस्त्याने ओरडत सुटलेले असतात. पुन्हा जनता पाच वर्षे ओरडत राहते पण या पांढऱ्या बगळ्यांना ते ऐकूही येत नाही. थेट पुढच्या निवडणुकीलाच ते गावात टपकतात आणि पुन्हा मागच्या वेळी दिलेली आश्वासने मतदारांच्या तोंडावर मारली जातात.
लोकही निमुटपणे ऐकून घेतात आणि पुन्हा त्यांनाच मताचा जोगवा वाढतात. नाशिक जिल्ह्यातील सटाणा जवळच्या मुंजवाड गावाने मात्र राजकीय पुढाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे, आमच्या गावात यायचंच नाही असे या गावाने राजकीय मंडळीना बजावले आहे.
'सर्व राजकीय पुढाऱ्यांना मुंजवाड प्रवेश बंद !' असे फलकच गावकऱ्यानी गावाच्या सगळ्या बाजूंच्या रस्त्याला लावले आहेत. त्यामुळे हे गाव चर्चेत आले आहे. एखादा पुढारी तसाच गावात घुसला तर त्याचे कांदे फेकून स्वागत केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, त्याने कष्ट करून पिकवलेल्या शेत मालाला बाजारात कवडीचा भाव मिळणे देखील कठीण झाले आहे.
दोन दिवसांपूर्वीच एका शेतकऱ्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवर टोमॅटो फेकून दिल्याची मोठी चर्चा झाली आहे. आता कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे. मंत्री भारती पवार यांनी तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी नाफेडमार्फत करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र दुसरीकडे अद्यापही शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव नसल्याने शेतकरी आंदोलन करत आहेत.
'शेतकऱ्यांचे सरकार' म्हणून राज्यकर्ते ढोल वाजवत आहेत पण प्रत्यक्षात सरकार आपली सत्ता टिकविण्यासाठीच गेले ९ महिने परिश्रम घेत आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत पण राज्यकर्ते सत्तेच्या मागे धावताना दिसत आहेत.
दिवसा वीज नाही, शेतीमालाला भाव नाही, कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. तसेच इतर शेतीमालाला ही भाव नसल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट अशी झाली आहे पण कुणालाच काही सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकरी वाऱ्यावर सोडला आहे.
जगाचा पोशिंदा रोज आत्महत्या करीत आहे. मुंजवाड गावातील गावकऱ्यांनी मात्र निषेध करीत प्रवेश बंदी केल्याने पुढारी हादरले आहेत. गावोगाव अशीच भूमिका घेतली तर पांढरे कडक कपडे घालून वावराने मुश्किल होणार आहे. अशाच पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व गावकऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांना बंदी केल्यास निष्क्रिय ठरलेले राजकीय पुढारी,
प्रतिनिधी यांनी शासनाला जाब विचारला पाहिजे.अशी प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे. एकीकडे अतिवृष्टी व गारपिटीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या कांदा व शेतीपिकाला सध्या कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे..अशा परिस्थिती आमदार, खासदार, मंत्री तसेच राजकीय पुढारी हे मात्र शेतकऱ्यांच्या कामी येत नसल्याचा आरोप करीत
मंजवाड येथील शेतकऱ्यांनी गावाच्या चारही दिशेला 'राजकीय पुढाऱ्यांना मुंजवाड गावात प्रवेश बंद ' असे फलक लावले आहे. गावागावात असा उठाव झाला तर या कडक खादी आणि इस्त्रीच्या घडीचे कपडे घालून, पुन्हा पुन्हा तीच आश्वासने देत फिरणाऱ्यांना चांगलाच धडा मिळणार आहे.


0 Comments