google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज... सोलापूर ग्रामीणचा पोलीस हवालदार लाच घेताना पकडला !

Breaking News

ब्रेकिंग न्यूज... सोलापूर ग्रामीणचा पोलीस हवालदार लाच घेताना पकडला !

ब्रेकिंग न्यूज... सोलापूर ग्रामीणचा पोलीस हवालदार लाच घेताना पकडला !


सोलापूर जिल्ह्यातील आणखी एका पोलिसाला बेड्या पडल्या असून चाळीस हजाराच्या लाचखोरीत एक पोलीस हवालदार गोत्यात आला आहे. 

लाचाखोरांच्या मुसक्या सतत आवळल्या जात असतानाही फुक्कटच्या पैशाचा मोह काही सुटत नाही हेच पुन्हा पुन्हा दिसून येत आहे.

शासकीय विभागात लाचखोरीचे प्रमाण सतत वाढताना दिसत असून, महसूल, पोलीस विभाग यांची अनेक प्रकरणे सतत चव्हाट्यावर येत आहेत. लाच देण्याचे मान्य नसलेले नागरिक थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करीत आहेत

 आणि शिपायापासून साहेबांपर्यंत सगळेच सापळ्यात अडकत आहेत. तरी देखील लाचेची प्रकरणे कमी होताना दिसत नाहीत. फुकटच्या काही रकमेसाठी चांगल्या पगाराची नोकरी संकटात आणण्याचे काम हे लाचखोर करीत असतात. 

आता पुन्हा सोलापूर  जिल्ह्यात बार्शी पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी चाळीस हजाराच्या लाच प्रकरणात पकडला गेला 

असून पोलीस दलात पुन्हा एकदा हा खळबळीचा आणि चर्चेचा विषय बनला आहे. पन्नास हजार रुपयांची लाच मागण्यात आली आणि चाळीस हजार रुपयावर तडजोड झाल्याचे हे प्रकरण पोलीस हवालदारास भलतेच महागात पडले आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार हर्षवर्धन हरिश्चंद्र वाघमोडे (बक्कल नं ५५ ) याच्यावर या लाच प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 

बार्शी तालुका पोलीस ठाण्यात, तक्रारदार आणि नातेवाईक यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम कलम १४३, १४७, १४८ १४९, ३२४, ३२७, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. 

या गुन्ह्याप्रकरणी तक्रारदार आणि नातेवाईक यांना अटक करून लगेच जामिनावर सोडतो तसेच या गुन्ह्याप्रकरणी मदत करतो

 असे सांगून ५० हजार रुपयांची लाच मागितली गेली. तक्रारदार आणि पोलीस हवालदार हर्षवर्धन वाघमोडे यांच्यात तडजोड होऊन, चाळीस हजार रुपये लाचेची रक्कम अंतिम करण्यात आली.

तक्रारदारास ही लाच देणे मान्य नसल्यामुळे त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि लाच मागणी प्रकरणी आपली तक्रार दिली. 

सदर तक्रार प्राप्त होताच या विभागाने वेगाने हालचाली केल्या. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला आणि सदर पोलीस कर्मचारी चाळीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडला गेला.

  काल मंगळवारी ही कारवाई झाली असून लाच स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हर्षवर्धन वाघमोडे यांना ताब्यात घेतले आणि पुढील कारवाई सुरु केली. 

या घटनेने पुन्हा एकदा सोलापूर ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. बार्शी परिसरात या घटनेची चर्चा सुरु असून पोलीस कशा प्रकारे लाचखोरी करतात याच्याची सुरस कथा परस्परांना सांगितल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments