रांगड्या माणदेशी भाषेतील डायलॉग 'काय झाडी...काय डोंगर'
नंतर आता आमदार शहाजी पाटलांना प्रवचनासाठीही आमंत्रणे
काय झाडी...काय डोंगर..काय हाटील..समंद काय ओके आहे.... या रांगड्या माणदेशी भाषेतील डायलॉग मुळे मोठी लोकप्रियता मिळवत
थेट सेलिब्रिटी झालेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातही उत्तम प्रवचनकार व निरूपणकार म्हणून प्रसिद्धीस येत आहेत.वक्ता दशसहस्रेषु म्हणून परिचित असणाऱ्या शहाजीबापू पाटील यांना प्रवचनकार म्हणून सध्या सर्वत्र मागणी वाढते आहे.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्ष काळात आपल्या माणदेशी भाषेतील डायलॉग मुळे मोठी लोकप्रियता मिळवलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील अचानक सेलिब्रिटी म्हणून प्रसिद्ध झाले. राज्यातील विविध भागातील कार्यक्रमांना,उद् घाटनसाठी त्यांना बोलावण्यात येऊ लागले.
सन १९८९ पासून तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय झालेले शहाजीबापू पाटील हे फर्डा वक्ता म्हणून प्रसिद्ध आहेत.
त्यावेळी राज्याच्या युवक काँग्रेसचे नेतृत्व करत असताना त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषण शैली मधून युवकांची एक वेगळी फळी तयार केली होती. काँग्रेसच्या चिंतन शिबिरातील त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांसाठी त्यावेळच्या दिग्गज नेत्यांनी त्यांच्या कौतुक केले होते.
तरुणांमधून त्यांनी अनेक कार्यकर्ते व नेते तयार केले. त्यांच्या त्यावेळच्या संपर्कातून तयार झालेली अनेक नेते सध्याही राज्याच्या विविध भागात पाहावयास मिळतात.
सध्या राज्यामध्ये राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या वक्त्यांमध्ये शहाजीबापू यांचा समावेश होतो.राजकीय व्यासपीठावरून त्यांनी केलेली अनेक राजकीय भाषणे प्रचंड गाजली आहेत.
आपल्या अभ्यासपूर्ण राजकीय भाषणांमधून ते राज्यातील अनेक नेत्यांना चितपट करतात. निर्भीडपणे टीका करताना ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत. स्पष्ट वक्ता म्हणून ते सुपरिचित आहेत.
राजकीय व्यासपीठावर गाजवणारे शहाजी बापू पाटील अध्यात्मिक व धार्मिक व्यासपीठावर ही आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. गावोगावी होणारे हरिनाम सप्ताह, धार्मिक कार्यक्रम यामध्ये शहाजी बापू प्रवचन करतात.
या अध्यात्मिक व्यासपीठावर ही नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ते माणदेशी रांगड्या भाषेचा वापर करतात. ग्रामीण लोकांना त्यांची भाषा आवडते.
विशेष म्हणजे ते चालू घटनांची सांगड प्रवचना मधील अध्यात्मिक घटनांशी घालतात.
त्यामुळे प्रवचन अधिक रंजक व प्रभावी ठरते. प्रवचनांमधून ते आई-वडिलांची सेवा करावी,मृत्यू अंतिम सत्य आहे, जाताना कोणी काहीच नेणार नाही, घरातील वातावरण चांगले ठेवण्यासाठी माता-भगिनी यांनी कसे वागावे,
विद्यार्थ्यांनी जिद्द- चिकाटी-सातत्य यावर कसा भर द्यावा,हातून सेवा घडावी,द्वेष करू नका,परमेश्वराकडे हक्काने मागा यासह थोर देशभक्त-क्रांतिकारक, पौराणिक घटना यांचे दाखले देऊन तर कधी-कधी वैयक्तिक जीवनातील अनुभव कथन करून पटवून देतात.
पौराणिक दुर्बोध अर्थात कळण्यास कठीण असणारे पौराणिक संदर्भ ते आपल्या सोप्या व रांगड्या भाषेत सांगतात.
त्यामुळे त्यांचा एक श्रोतावर्ग तयार झाला असून प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याप्रमाणे आमदार शहाजीबापू पाटील यांचीही प्रवचनासाठी मागणी वाढते आहे.
0 Comments