खळबळजनक.. पोलिसांनीच चोरीतील दीड किलो सोन्यावर मारला डल्ला :
करगणी-रामनगर येथील संशयिताची जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे तक्रार
आटपाडी : ‘चोरावर मोर’ या म्हणीप्रमाणे पोलिसांनीच चोरीच्या सोन्यावर डल्ला मारल्याची तक्रार चोरीतील संशयित सागर जगदाळे (रा. करगणी ता. आटपाडी) याने पोलिस प्रमुख डॉ.बसवराज तेली यांच्याकडे केली आहे. या प्रकाराने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, १६ फेब्रुवारी रोजी विटा पोलिस ठाण्यामध्ये सूरज मकबुल मुल्ला याने खोटी तक्रार दिली होती. त्याने आपल्या दुकानात कामास असणाऱ्या सागर लहू मंडले यास कोलकाता येथे घेऊन जाण्यासाठी विटा येथे १०० ग्रॅम सोने दिले होते,
तसेच शंकर जाधव यांचेही ४५५ ग्राम सोने त्याच्याकडे होते. मात्र कोलकात्यास पोहचले नाहीत. त्यामुळे त्याने सोन्याची चोरीची तक्रार दिली होती.
तपासाच्या दरम्यान विटा पोलिसांनी सागर मंडले याचा मित्र सागर जगदाळे याला ताब्यात घेत, सागर मंडले सोने घेऊन फरार असल्याचे सांगितले.
यावेळी सागर जगदाळे याने सागर मंडले याने आपल्याकडे दोन किलो सोने दिल्याचे सांगितले. यापैकी ४५५ ग्रॅम सोने विकले असून, राहिलेले १,५४५ ग्राम सोने आपल्या बहिणीकडे ठेवल्याची कबुली दिली.
यानंतर, पोलिसांनी हे सोने ताब्यात घेतले. सागर जगदाळे यास चार दिवस पोलिस ठाण्यात ठेवून अत्याचार केला.या प्रकरणातील मूळ फिर्यादीमध्ये केवळ १०० ग्रॅम सोने चोरीची तक्रार होती.
तपासात दोन किलो सोने हस्तगत केले असताना, पोलिसांनी केवळ ४५५ ग्रॅम सोने रेकॉर्डवर घेतले. उर्वरित १,५४५ ग्रॅम सोने पोलिसांनी हडप केल्याचा आरोप सागर जगदाळे याने केला आहे.
याबाबतचे पुरावेही त्याने पोलिस अधीक्षकांकडे सादर केले असून, विटा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची यांची चौकशी व्हावी, त्यांच्यापासून आपल्या जीवास धोका असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
0 Comments