पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सातवेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या
काँग्रेसच्या “या” नेत्याचे निधन
पंढरपूर : पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सातवेळा निवडून गेलेले काँग्रेसचे माजी खासदार संदीपान भगवान थोरात (वय ९१) यांचे आज सायंकाळी सोलापुरात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात वृध्द पत्नीसह चार विवाहित पुत्र, तीन विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे.
संदीपान थोरात हे पेशाने वकील होते. ते माढा तालुक्यातील निमगाव येथील मूळ राहणारे होते. तरूणपणीच काँग्रेसच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले.
१९७७ साली काँग्रेसच्या पडत्या काळात त्यांना पंढरपूरच्या तत्कालीन लोकसभा राखीव मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती.
तेव्हा देशभर जनता पक्षाची लाट असतानाही थोरात हे निवडून आले होते. नंतर त्यांनी मागे पाहिलेच नाही. पुढे १९८०, १९८४, १९८९, १९९१, १९९६ आणि १९९८ पर्यंत असे सलग सातवेळा थोरात यांनी पंढरपूर मतदारसंघातून लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते.
१९९९ साली लोकसभा निवडणुका झाल्या. तेव्हा पंढरपूरमध्ये काँग्रेसने पुन्हा आठव्यांदा उमेदवारी दिली होती. परंतु राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले रिपाइं नेते रामदास आठवले यांच्याकडून थोरात यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर मात्र ते राजकारणापासून दूर राहिले होते.


0 Comments