Breaking News

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर... इच्छुकांचे जनसंपर्क अभियान थंडावले!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर... इच्छुकांचे जनसंपर्क अभियान थंडावले!


पुणे : नगर परिषद, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका आता दिवाळीनंतरच जाहीर होतील, अशी शक्यता वतर्वली जात आहे. यामुळे इच्छुकांनी इतर खर्चांना कात्री लावणेच पसंत केले आहे.तर काहींचे जनसंपर्क अभियान थंडावले आहे.

स्थानिक महापालिका, जिल्हा परिषद तथा नगर परिषदेत प्रशासक नेमून सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. त्यामुळे महापालिका व जिल्हा परिषदेचे सदस्य सहा ते आठ महिन्यांपासून पदाविना आहेत. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडायचा

 असल्यामुळे इच्छुकांनी सार्वजनिक तथा सामाजिक कार्यक्रमात सढळ हाताने खर्च करण्यास सुरुवात केली होती. नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्यांनीही विविध कार्यक्रमांसाठी वर्गणी देणे तसेच इतर खर्च केला. मात्र, आता निवडणुकांची शक्यता मावळल्याने अनेकांनी जनसंपर्क अभियानाला पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, ग्रामीण भागात जिल्हा परिषद निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांची अवस्थादेखील अशीच आहे. अनेकांनी वर्ष-दीड वर्षापासून जनसंपर्काच्या माध्यमातून तयारी सुरू केली होती. परंतु निवडणुकीचा काही ठावठिकाणा दिसत नाही, हे पाहून त्यांनी पावसाळा संपल्यानंतरच तयारी सुरू करायची, असा निर्णय घेतला आहे. 

महापालिका निवडणूक उन्हाळ्यात होईल, या आशेने बहुसंख्य इच्छुक तथा आजी-माजी नगरसेवकांनी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी व नवीन वर्षानिमित्ताने अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह जेवणावळी राबवल्या. परंतु, आता महापालिका निवडणुकदेखील दिवाळी नंतरच होतील, अशी चिन्हे असल्यामुळे त्यांचाही हिरमोड झाला आहे.

एरवी सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्रीदेखील इच्छुक उमेदवार प्रभागात फिरायचे, लोकांच्या समस्या ऐकून घ्यायचे. आता मात्र ते प्रभागात दिसेनासे झाले आहेत. 

इच्छुक महिला उमेदवारांनी हळदी-कुंकू किंवा महिला दिनाचे कार्यक्रम या वर्षी म्हणावे तेवढे खर्चीक किंवा उत्साहात साजरे केले नाहीत. केवळ कार्यक्रम घ्यावा लागतो म्हणून अनेकांनी सोपस्कार पार पाडले.

Post a Comment

0 Comments