मोठी बातमी; तयारीला लागा, महाराष्ट्र विधानसभेचा धुरळा लोकसभेसोबत उडणार?
केंद्र आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपकडून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबत घेण्याची चाचपणी केली जातेय. राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केली असून त्यावर विचार केला जात आहे. लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मे २०२४ मध्ये होणार आहेत,
तर महाराष्ट्र विधानसभेची निवडणुका ऑक्टोबर २०२४ मध्ये पार पडणार आहत. त्यामुळे दोन्ही निवडणुकांमध्ये जास्त कालावधी नसल्याने एकत्र घेण्यास देखील अडचण नसल्याचा मुद्दा महाराष्ट्र भाजपकडून मांडण्यात आला असल्याचे वृत्त ‘द हिंदू’ वृत्तपत्राने दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही निवडणुका एकत्र झाल्यास मतदारांवर त्याचा प्रभाव पडेल. मोदी यांचे आवाहन आणि राष्ट्रीय मुद्दे मतदारांच्या मनावर प्रभाव टाकतील. त्यामुळे दोन्ही निवडणुका एकत्र झाल्यास त्याचा फायदा भाजपला होऊ शकेल,
असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, “राज्यातील पक्षाच्या वरिष्ठांनी ही सूचना केली असून केंद्रीय नेतृत्व आता या पर्यायाचा विचार करत आहे. योग्य वेळी फोन निर्णय घेतला जाईल” असं राज्याच्या निवडणूक रणनीतीमध्ये सहभागी असणाऱ्या एका मंत्र्याने सांगितलं आहे.
दरम्यान, आजच्या घडीला कोणाशी युती झाली नाही तरी भाजप सत्तेत येऊ शकते, असा विश्वास वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप राज्यात २४० जागा लढवेल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला ४८ जागा मिळतील, असे वक्तव्य केलं होत. बावनकुळे यांच्या विधानानंतर वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.


0 Comments