सोलापूर - पुणे महामार्गावरील अपघातात बहिण भावाचा मृत्यू !
सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर स्विफ्ट कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात बहिण भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दुभाजकाला धडकून कार विरुद्ध दिशेला गेली आणि एका कंटेनरला धडकली.
सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघात वाढत असतानाच पुन्हा एकदा एक अत्यंत थरारक आणि भीषण असा अपघात घडला आहे. भरधाव वेगात निघालेल्या स्विफ्ट कारचा टायर अचानक फुटला आणि त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले.
वेगात असलेली कार रस्ता दुभाजकाला धडकली आणि दुभाजकाला धडकून पुन्हा विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेली.
टायर फुटल्याने आणि गाडी वेगात असल्यामुळे चालकाचे कसलेही नियंत्रण या कारवर उरले नव्हते. दुभाजकावरून ही कार (एमएच. 06, बीयु. 4089) दुसऱ्या रस्त्याला गेली आणि समोरून येत असलेल्या कंटेनरला जाऊन धडकली. यात कारमधील भाऊ बहिणीचा मृत्यू झाला. कुरकुंभजवळ मळद येथे अपघाताची ही घटना घडली.
सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने ही कार निघाली होती तर पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने कंटेनर (एमएच. 43, वाय. 4669) जात होता. स्विफ्ट कार दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूच्या सोलापूर लेनवरील कंटेनरला जाऊन जोराने धडकली. या अपघातात स्विफ्ट कारची पुढील डावी बाजू पूर्ण फाटून गेली.
स्विफ्ट गाडीतून शिल्पा तुलशी गिरी (वय ३०) आणि भाऊ साधव गौरव गिरी (वय २४) हे दोघे पुण्याकडून बिदर जिल्ह्यातील भालकी येथे आपल्या गावाकडे सुट्टीनिमित्त निघाले होते परंतु भरधाव वेग आणि टायर फुटल्याने मोठा अनर्थ घडवला. कंटेनरला जोराची धडक दिल्याने शिल्पा गिरी या जागीच ठार झाल्या आणि त्यांचे भाऊ साधव गिरी हे गंभीर स्वरुपात जखमी झाले.
साधव गिरी हे कार चालवत होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणायत आले परंतु उपचारा दरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे परंतु भाऊ बहिणीचा बळी या अपघातात गेल्याने प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments