google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक बातमी..सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण बँक फोडली, सोने, रोकड लंपास !

Breaking News

धक्कादायक बातमी..सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण बँक फोडली, सोने, रोकड लंपास !

 धक्कादायक बातमी..सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण बँक फोडली, सोने, रोकड लंपास !

 सोलापूर :- चोऱ्यांचे प्रमाण वाढत असतानाच त्यांची मजल आता बँकेपर्यंत पोहोचली असून अज्ञात चोरट्यांनी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण बँक फोडून सोने आणि रोकड लंपास केल्याची धक्कादायक बाब आज उघडकीस आली आहे. 

चोरीचे प्रकार अलीकडे नित्याचे होत असून दुचाकीपासून घरफोडीपर्यंत सगळ्या प्रकारच्या चोऱ्या बिनधास्त होत आहेत. पोलीस प्रचंड परिश्रम घेत असतानाही चोरांचे मनोधैर्य भलतेच वाढलेले असल्याचे दिसत आहे.

 घरफोडी, रस्त्यावर अडवून लुटणे असे प्रकार होत असताना आता त्यांची मजल थेट बँकेपर्यंत पोहोचली असून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक अज्ञात चोरट्यांनी मोठ्या कौशल्याने फोडली असून पुरावे मागे उरणार नाहीत याचीही काळजी घेतली असल्याचे दिसत आहे. 

कुठलीही बँक सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी काळजी घेत असते पण चोर देखील त्यापुढे एक पाऊल टाकत असतात. गादेगाव येथील बँक फोडतानाही चोरट्यांनी अशीच काळजी घेतली असून सीसीटीव्ही आणि सायरनचे कनेक्शन आधी कापण्यात आले आणि नंतर बँक फोडण्यात आली आहे.

बँकेत चोरटे प्रवेश करून काही करण्याच्या प्रयत्नात असताना सायरन सुरु होत असते आणि त्यामुळे परिसरात सूचना मिळू लागते परंतु या चोरट्यांनी आधी सायरनचाच 'आवाज' बंद केला त्यामुळे चोरी करून ते सहीसलामत पसार होऊ शकले आहेत. 

शनिवारी आणि रविवारी बँकेला सुट्टी होती. शुक्रवारी सायंकाळी कामकाज संपल्यावर गादेगाव येथील कोकण विदर्भ ग्रामीण बँक बंद करण्यात आली आणि थेट आज सोमवारीच सकाळी ती उघडण्यात आली. आज सकाळी बँक उघडण्यावेळी चोरट्यांनी बँक फोडली असल्याचा प्रकार लक्षात आला.

 त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि एकूण परिस्थितीची पाहणी केली. खिडकी तोडून अज्ञात चोरट्यांनी बँकेत प्रवेश केल्यानंतर मुख्य विद्युत पुरवठाच खंडित केला आणि सीसीटीव्ही चे कनेक्शन कापून टाकले. 

गॅस कटरच्या साहाय्याने तिजोरी कापून अडीच लाख रुपयांची रोकड आणि जवळपास दोन लाख रुपयांचे सोने लंपास केले असल्याचे प्रथमदर्शी दिसून आले आहे. बँक अधिकारी, कर्मचारी अधिक पडताळणी करीत असून पोलीसांनी पुढील कार्यवाही सुरु केली आहे.

Post a Comment

0 Comments