शिरभावी योजनेत ३५० किलोमीटर लांबीची नवीन पाइपलाइन टाकणार शहाजीबापू पाटील यांची माहिती :
२९९ कोटींचा येणार खर्चआणखी एक जलशुद्धीकरण केंद्र बांधणार....
सांगोला : जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत सन २०५४ ची लोकसंख्या विचारात घेऊन सांगोला तालुक्यातील गाव, वाड्या वस्त्यांवरील नागरिकांची तहान भागविणाऱ्या शिरभावी प्रादेशिक नळपाणी
पुरवठा योजना शिरभावी टैकपासून सुमारे ३५० कि.मी. लांबीची नवीन डीआय पाइपलाइन टाकून भक्कम करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे २९९ कोटी रुपये खर्च होणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
तत्कालीन शिवसेना-भाजप युती सरकारकडून आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन सांगोला तालुक्यातील ८२ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली होती. ही योजना कार्यान्वित होऊन जवळपास २२ वर्षे पूर्ण झाली.
दरम्यान आताची सन २०३० च्या लोकसंख्येप्रमाणे २२ एमएलडीचे जलशुद्धीकरण केंद्र सध्या शिरभावी टैंक येथे आहे. सन २०५४ च्या प्रकल्पात लोकसंख्येसाठी आणखी एक १८ एमएलडीचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र शिरभावी येथे बांधण्यात येणार आहे.
शिरभावी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शिरभावी, मानेगाव, वाणीचिचाळे, कोळे, कटफळ, बुरलेवाडी या टाक्यांना पंपाद्वारे डीआय पाइप जोडणार आहे. त्यासाठी नवीन पंप टाक्यांच्या ठिकाणी बसवले जाणार आहेत.
पाइपलाइन शिरभावी योजनेसाठी वापरली आहे ती सन २०५४ च्या लोकसंख्येला पूरक होत नसल्याने व शिरभावी योजना हा स्तोत्र धरून जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून वाड्यावस्त्यांसाठी ६० ते ६५ योजना तयार केल्यामुळे मूळ शिरभावी योजना भक्कम करणे गरजेचे आहे.
त्यामुळे ही योजना जलजीवनमिशनकडे वर्ग केली आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाकडून उच्च दर्जाची कोटिंग असलेल्या डीआय पाइपचा पुरवठा केला जाणार आहे. तर या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत सोलापूर येथील ठेकेदाराकडून केले जाणार आहे.


0 Comments