ग्रामपंचायत निवडणूक विजयी मिरवणुकीवर बंदी !
ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार धडाक्यात झाला पण या निवडणुकीत विजयी झाल्यावरही मिरवणुकीचा जल्लोष करता येणार नाही. विजयी मिरवणुकीवर जिल्हाधिकारी यांनीच बंदी घातली असून तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून गावागावात ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य पदांसाठी निवडणूक प्रचार सुरु होता. विविध गावातील लढतीने लक्ष वेधले असताना या काळात अनेक गैरप्रकार देखील समोर आले आहेत.
आमिषे दाखविण्यापासून जादूटोणा, भानामती करण्यापर्यंत काही धक्कादायक घटना देखील या प्रचार काळात घडल्या आहेत. प्रचाराचा धुमाकूळ आता संपला असून उद्या रविवारी प्रत्यक्ष मतदान होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील १८८ पैकी १३ ग्रामपंचायतीची निवडणूक या आधीच बिनविरोध झालेल्या आहेत
आणि १७५ ग्रामपंचायतीसाठी मतदान रविवारी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून संबंधित गावात जमावबंदीचे आदेश सोलापूर जिल्हाधिकारी यांनी लागू केले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना विजयाची मिरवणूक काढता येणार नाही.
चुरशीच्या निवडणुका झाल्यानंतर विजयी उमेदवार जोरदार जल्लोष करीत असतात परंतु यावेळी या आनंदावर या आदेशाने पाणी पडणार आहे.
प्रशासनाने आधीपासूनच दक्षता घेतली असून सोलापूर जिल्यातील काही लोकांना नोटीसा देखील बजावल्या आहेत. १८८ गावातील १ हजार ५४७ लोकांना कलम १०७ नुसार नोटीसा दिल्या असून त्यांच्याकडून चांगल्या वर्तनाचा बॉण्ड लिहून घेण्यात आला आहे. सराईत अशा ३५ गुन्हेगारांना नोटीसा देवून कडक ताकीद देण्यात आली आहे.
विनापरवाना कुणालाही आंदोलन अथवा मिरवणूक काढता येणार नाही आणि पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही. अंत्ययात्रा आणि विवाह वगळता अशा प्रकारे कुणी एकत्र फिरत असलायचे आढळल्यास जमावबंदी आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसा इशाराच पोलिसांनी दिला असून प्रत्येकाने कायदा पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत विजय संपादन केल्यावर कुणीही मिरवणूक काढू नये असे प्रशासनाने स्पष्ट केले असून शांतताभंग करणाऱ्याच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
गावातील पोलीस पाटील यांना देखील सूचना देण्यात आल्या असून ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील कोणत्या गटाची बाजू घेऊन प्रचार किंवा अन्य काही कृत्य केल्यास,पोलीस पाटील यांच्यावर देखील कडक कारवाई करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाने बजावले आहे.
0 Comments