राज्यात शालेय विद्यार्थ्यांचा गृहपाठ होणार बंद
नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी आता समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
राज्यात लवकरच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार असून त्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रम आणि त्याच्या रचनांमध्ये बदल केले जाईल. त्याचाच भाग म्हणून पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे ओझे न लावता, त्यांच्या मेंदूचा विकास होण्याकरिता त्यांचा गृहपाठ बंद केला जाणार आहे, अशी महत्त्वाची माहिती केसरकर यांनी दिली.
पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गृहपाठ बंद करण्याची घोषणा केसरकर यांनी १६ सप्टेंबर रोजी केली होती. त्यानंतर शिक्षण विभागाकडे अनेक संस्थांनी या अभ्यासक्रमासाठी शिफारशी केल्या आहेत.
त्यांच्या शिफारशी आता लक्षात घेतल्या जाईल. राज्यातील विविध शिक्षक संघटना, संस्थाचालक, शिक्षणतज्ज्ञ यांच्याशी चर्चाही केली जाणार आहे. त्याकरिता शालेय शिक्षण विभागामार्फत बैठका घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार, असे म्हटले जात आहे.
गृहपाठ बंद झाल्यास शिक्षक, शाळा चुकीचा अर्थ काढतील, त्यातून पळवाटा काढतील, यासाठी विशेष खबरदारी घेतली जाईल. नवीन आणि सध्याचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना पटकन आणि योग्य समजेल, अशा पद्धतीने शिक्षकांनी शिकवण्याची आवश्यकता आहे. अशाच पद्धतीने शिकविल्यास विद्यार्थ्यांना गृहपाठाची गरज नसल्याचे केसरकर यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते.


0 Comments