शिंदे गटातील आमदार फोडून फडणवीस होणार मुख्यमंत्री ! नवल वाटायचे कारण नाही शिवसेनेच्या फायरब्रँड उपनेत्या सुषमा अंधारे
सोलापूर:- शिंदे गटातील वीस आमदार फोडून एक दिवस भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, आणि असे झाले तर नवल वाटायचे कारण नाही असा दावाच शिवसेनेच्या फायरब्रँड उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
भूखंड प्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी विद्यमान अधिवेशनात केला आहे पण यामागे भारतीय जनता पक्षाचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. शिवसेना फोडून एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले
आणि भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. या बंडामागे देवेंद्र फडणवीस होते हे या आधीच उघड झाले आहे. शिवसेनेचा बदला घ्यायचा होता असे फडणवीस यांनी देखील स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्यानंतर सत्ता स्थापनेनंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील
आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील असे सर्वानाच वाटत असताना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस याना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. यावेळी फडणवीस यांची नाराजी देखील उघड झाली होती.
शिंदे गटाला भाजपच मोठा फटका देईल असे राजकीय जाणकारांतून सतत बोलले जात आहेच परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणे भाजपातील अनेकांना रुचले नसल्याचे उघडपणे समोर आले आहे.
छातीवर दगड ठेवून एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री केल्याचे भाजपचे जेष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण प्रदेशाध्यक्ष पदावर आहे तोपर्यंत देवेंद्र फडणवीस याना मुख्यमंत्री पदावर पाहायचे आहे
असे नुकतेच म्हटले आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप झाले आणि या आरोपांमागे भाजपच आहे असे देखील आरोप करण्यात येऊ लागले. दरमण्या आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट दावा केला आहे.
एक दिवस एकनाथ शिंदे यांच्या गटातील चाळीस आमदारांपैकी वीस आमदार फोडून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनतील आणि हा दिवस लवकरच येईल. असे घडले तर नवल वाटायला नको असे अंधारे यांनी आज सोलापूर येथे म्हटले आहे.
सुषमा अंधारे यांचा सोलापूर दौरा सुरु असून त्यांच्या या दौऱ्याबाबत जनमानसात प्रचंड उत्सुकता आहे. सोलापूर दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी मोठा बॉम्ब टाकला असून त्यांच्या या विधानाची चर्चा देखील सुरु झाली आहे.
८३ कोटींच्या भूखंड प्रकरणी एकनाथ शिंदे याना अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपच करीत आहे. शिंदे याना अडकविण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जात आहेच पण शिंदे गटातील वीस आमदार फोडून आपल्या टीममध्ये फडणवीस यांनी दाखल करून घेतले तर आजिबात नवल नाही.
देवेन्द्रजी ऊस बाळा का नाम है, जे आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही पंतप्रधान पदावर दावा करू शकतात आणि आव्हान देऊ शकतात असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
प्रादेशिक पक्षाशी दोस्ताना करून आपली शक्ती वाढवायची आणि योग्य वेळ येताच मित्रपक्षाला संपवायचे हा भाजपचा कार्यक्रम असतो आणि हेच चित्र देशभर पाहायला मिळालेले आहे असा आरोप भाजपवर सतत होत आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या बाबतीत हाच अनुभव आहे त्यामुळे सुषमा अंधारे यांच्या या दाव्यावर कुणाचाही विश्वास बसू शकतो अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.


0 Comments