चिंताजनक घटना.. विवाह जुळत नसल्याने तरुणाची आत्महत्या !
सोलापूर:- विवाह जुळणे ही देखील एक मोठी समस्या बनू लागली असताना लग्न होत नसल्याच्या नाराजीतून एका पदवीधर तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची चिंताजनक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे.
चाललंय तरी काय ?
नोकरी आणि विवाह ही अलीकडे सर्वात मोठी समस्या बनली आहे. मुलींचा जन्मदर कमी झाल्याने विवाहासाठी मुलगी मिळणे अलीकडच्या काळात कठीण झाले आहे.
त्यात बेकारीची समस्या वाढतच आहे. मुलाला नोकरी नसली अथवा मुलगा कमावता नसला की त्याला मुलगी मिळत नाही. मुलीचे पालक अशा तरुणांना मुलगी देण्यास धजावत नाहीत शिवाय अलीकडील काळात मुलींच्या अपेक्षा देखील भलत्याच वाढू लागल्या असून या अपेक्षा तरुणाकडून पूर्ण होत नाहीत
त्यामुळे विवाह जुळणे ही एक मोठी समस्या भेडसावत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापुरात तरुणांनी एक अभिनव मोर्चा देखील काढलेला होता. या मोर्चाची चर्चा सुरु असतानाच मोहोळ तालुक्यातील या घटनेने चिंता निर्माण केली आहे.
मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील भीमाशंकर काशिनाथ म्हमाणे या २२ वर्षे वयाच्या तरुणाने विवाह जुळत नसल्याच्या नाराजीतून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील डी फार्मसी ही पदवी घेतलेल्या भीमाशंकर याला मेडिकल दुकान सुरु करायचे होते. दरम्यान विवाहायोग्य वय झाल्यामुळे गेल्या वर्षापासून त्याच्या कुटुंबीयांनी विवाहासाठी मुलीचे स्थळ शोधण्याचा प्रयत्न केला.
या प्रयत्नाला यश येताना दिसत नव्हते. कुठल्या ना कुठल्या कारणांनी त्याला नकार दिला जात होता आणि यातूनच या तरुणाला नैराश्य आलेले होते. प्रचंड निराशेत जगणारा हा तरुण उदास आणि बेचैन होत होता. अखेर याच निराशेतून त्याने टोकाचे पाउल उचलले आणि शेतात जाऊन गळफास घेवून आपले जीवन संपवले.
आत्महत्या विविध कारणांनी होतात परंतु विवाह जुळत नसल्याचे देखील आत्महत्या झाल्याने जिल्हाभर प्रचंड हळहळ व्यक्त होऊ लागली आहे. हल्ली अनेक तरुणांचे विवाह होत नाहीत आणि मुली शोधण्यात तरुणाचे लग्नाचे वय देखील निघून जात आहे
त्यानंतर तर वय वाढले असल्यामुळे विवाहासाठी मुलगी मिळूच शकत नाही. विवाह जुळणे ही एक मोठी समस्या म्हणून समोर येताना दिसत असून भविष्यकाळात नेमकी काय परिस्थिती उद्भवेल याबाबत देखील चिंता व्यक्त होताना दिसत आहे.


0 Comments