सांगोला बस स्थानकावर एसटीत चढताना हातचलाखीने ८४ हजारांचे २७ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास पर्समधून दागिने पळविले..
सांगोला ज्योतिबाचे दर्शन करून गावाकडे जाण्यासाठी एसटीमध्ये चढताना गर्दीची संधी साधून अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधून हातचलाखीने ८४ हजारांचे २७ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना गुरुवार, दि. २९ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास सांगोला बसस्थानकावर घडली. याबाबत जयश्री दत्ता रेडे (रा. बुधवार पेठ, सोलापूर) यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याददिली आहे.
जयश्री दत्ता रेडे या कुटुंबासमवेत २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर येथील ज्योतिबाच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. तेथून दर्शन करून २९ डिसेंबर रोजी कोल्हापूर येथून सोलापूरला जाण्यासाठी निघाल्या होत्या. परंतु त्यांना तळसंगी (ता. मंगळवेढा) येथे जायचे असल्याने सर्व जण सांगोला बसस्थानकावर उतरले.
त्यावेळी त्यांनी सोन्याचे दागिने पाहिले असता पर्समध्ये होते.दुपारी १२.३० च्या सुमारास मंगळवेढ्याला जाणाऱ्या एसटीमध्ये चढताना चोरट्याने १ तोळ्याचे नेकलेस, १३ ग्रॅम सोन्याचे वेला झुबे, टॉप्स, ५ ग्रॅम सोन्याचे गंठण असे सोन्याचे दागिने काढून घेतले. दरम्यान, त्या तिकिटासाठी पर्समधून पैसे काढताना त्यांना पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. त्यांनी दागिन्यांचा आजूबाजूला शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.


0 Comments