स्वरांचा तारा निखळला! लावणी सम्राज्ञी सुलोचणा चव्हाण यांचं निधन
तुझ्या ऊसाला लागंल कोल्हा… गाण्याने महाराष्ट्राला भूरळ घातली होती
महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचं आज १० डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ८९ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.
अखेर आज दुपारी १२ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला…’ ‘पाडाला पिकलाय आंबा..’ ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’ यांसारख्या एकाहून एक लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या खर्जातल्या आवाजाच्या जादूने ठसकेबाज केल्या. याच वर्षी त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.
साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांची प्रकृती गेली काही दिवस खालावली होती. काही शस्त्रक्रिया आणि वयोपरत्वे आलेले आजारपण यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज शनिवार 10 डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘लावणीसम्राज्ञी’ अशी ओळख मिळालेल्या सुलोचनाबाईंनी शेकडो गाणे गायले. रसिकांच्या मनावर त्यांच्या ठसकेबाज लावण्या अधिराज्य गाजवत राहिल्या. आजही त्यांची गाणी कुठेना कुठे कानावर येतातच.
”फड सांभाळ तुऱ्याला गं आला, तुझ्या ऊसाला लागंल कोल्हा” या गाण्याला महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं. आजही हे गाणं प्रत्येकाच्या हृदयात आहे. ग.दि. माडगूळकर यांचं हे गीत असून वसंत पवार यांचं संगीत आहे. तर ठसकेबाज आणि बहारदार स्वर दिलेत सुलोचना चव्हाण यांनी.


0 Comments