महुद खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या गौतमी पाटील यांच्या लावणी कार्यक्रमांत तरुणांचा गोंधळ..!
सांगोला प्रतिनिधी :महुद ता. सांगोला येथे बुधवार दि ७ डिसेंबर रोजी खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या गौतमी पाटील यांच्या लावणी कार्यक्रमांत अज्ञात तरुणांनी गोंधळ घातला
असल्याची फिर्याद सांगोला पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे. या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात तब्बल ४ हजार लोकांचा जनसमुदाय महुद येथे जमला होता.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत अशी अल्पावधीत ओळख प्राप्त केलेल्या गौतमी पाटील यांचा ग्रामदैवत खंडोबा यात्रेनिमित्त बुधवार दि. ७ डिसेंबर रोजी महूद ता सांगोला येथे खंडोबा यात्रा कमिटीच्या वतीने लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता.
रात्री ७.३० वा. हा कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमाला महुद आणि परिसरातील तब्बल ३ ते ४ हजार लोक एकत्रित जमले होते.
कार्यक्रमादरम्यान अचानक रात्री ८.३० च्या सुमारास स्टेजच्या समोर बसलेल्या तरुणांमध्ये आरडाओरडा सुरू असल्याचे लक्षात आले. दोन गटात अज्ञात कारणावरून वाद निर्माण झाला होता. दोन्ही गटातील अंदाजे ३ ते ४ जण परस्परांच्या अंगावर धावून जात होते.
दरम्यान या ऑर्केस्ट्रासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने तात्काळ येथील ग्रामस्थ पोलीस पाटील यांनी मदतीने हा वाद संपुष्टात आणला.
दरम्यान पोलिसांनी एकमेकांच्या अंगावर धावून जाणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या दोन्ही गटातील तरुणांची नावे विचारले असता दोन्ही गटातील एका गटातील ३ ते ४ व्यक्ती तर दुसऱ्या गटातील २ ते ३ व्यक्ती गर्दीचा व अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस नाईक धुळदेव चोरमुले यांनी दोन्ही गटातील अज्ञात व्यक्तीविरुद्ध सांगोला पोलिसात भा.द.वि. कलम 160 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


0 Comments