चिकमहूद येथे भर दिवसा चोरी; लाखो रुपयांचा ऐवज लंपास सोन्या चांदीच्या दागिन्यासह; लाखो रुपयांचा ऐवज लंपास;
महूद/ प्रतिनिधी चिकमहूद (ता.सांगोला) येथील बंडगरवाडी पाटी जवळील बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत कपाटातील साडेसात तोळे सोन्याचे दागिने रोख १ लाख २५ हजार असा सुमारे ३ लाख रुपयेचा ऐवज चोरून नेला दरम्यान चोरी करून चोरटा घराबाहेर पडताना घर मालकाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला.
मात्र चोरट्याने त्याना सत्तुरचा धाक दाखवून रोडवर थांबलेल्या दुचाकी वरून धूम ठोकली. ही घटना काल शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास चिकमहुद- दिघंची रोडवरील बंडगरवाडी पाटीजवळ घडली, याबाबत धोंडीबा सिदा बंडगर यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
चिकमहूद बंडगरवाडी-१ येथील धोंडीबा सिदा बंडगर यांचे दिघंची रोड लगत राहते घर आहे. आज शुक्रवारी धोंडीबा बंडगर महूदला दवाखान्यात औषध उपचारासाठी गेले होते.
तर मुलगा जयवंत हे शिक्षक असल्याने सांगोला येथे शाळेवर गेले होते. धोंडीबा यांच्या पत्नी हौसाबाई यांनी घर कुलूप बंद करून घराच्या पाठीमागे अवघ्या ४०० फूट अंतरावर शेळ्या राखण्यासाठी गेल्या होत्या .चोरट्याने हीच संधी साधून त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला .
कपाटातील अर्धा तोळे सोन्याच्या तीन बोरमळ, पाऊण तोळे सोन्याचे तीन गंठण,एक तोळे सोन्याचे वेलजोड – झुमके, साडेचार ग्रॅम सोन्याची कर्णफुले ठुशी असे साडेसात तोळे सोन्याचे दागिन्यांसह रोख १ लाख २५ हजार रुपये असा ऐवज चोरी करून घराबाहेर पडले , नेमकं त्यावेळी धोंडीबा बंडगर घरासमोर आले
असता चोरट्याने हातातील सत्तूर उभारुन त्यांच्या अंगावर धावून आला म्हणून त्यांनी घाबरून मागे सरकले त्यावेळी रोडवर ५० फुटावर थांबलेल्या इसमाच्या दुचाकीवर त्या चोरट्याने धूम ठोकली. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे घरी कशाचा गोंधळ झाला म्हणून पत्नी हौसाबाई धावत घराकडे आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे पतीने तिला सांगितले.


0 Comments