google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंढरपूर तालुक्यात तेरा वर्षे वयाच्या मुलाची आत्महत्या !

Breaking News

पंढरपूर तालुक्यात तेरा वर्षे वयाच्या मुलाची आत्महत्या !

 पंढरपूर तालुक्यात तेरा वर्षे वयाच्या मुलाची आत्महत्या !

 पंढरपूर:-एका आत्महत्येची हळहळ थांबली नसतानाचा पंढरपूर तालुक्यात आणखी एका आणि अवघ्या तेरा वर्षे वयाच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

अपघात आणि आत्महत्या या नित्याच्या बाबी झाल्या असून सतत अशा नकारात्मक बाबी समोर येताना दिसत आहेत. रोज अपघातात निरपराध लोकांचे प्राण जात आहेत तर तरुण तरुणी आयुष्य सुरु होण्याआधीच शेवट करून घेत आहेत. जिवनात संकटे हा अविभाज्य भाग असला तरी त्यांचा सामना करायचा असतो हेच नव्या पिढीत रुजताना दिसत नाही. 

कुठलेही संकट असले तरी त्यावर मात करता येवू शकते यावर नव्या पिढीतील अनेकांचा विश्वास नसल्याचेच अशा घटनातून दिसत आहे. विविध कारणातून आलेल्या निराशेतून तरुण आत्महत्या करीत आहेतच पण शाळकरी मुले देखील या मार्गाकडे वळताना दिसू लागले आहेत.

 वडील रागावले, मोबाईल घेवून दिला नाही अशी कारणेसुद्धा अलीकडे आत्महत्येची बनू लागली आहेत. जीवन काय असते याची माहिती होण्याच्याही आधी अल्पवयीन मुले आपल्या आयुष्याचा शेवट करू लागली असून अशीच एक घटना पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथे घडली आहे.

पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील सुनील बापू होनकळस या केवळ १३ वर्षे वयाच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. सुनील हा पुळूज येथील शाळेत शिकत होता.

 आपल्या राहत्या घरीच त्याने हे टोकाचे पाउल उचलले आहे. राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला साडीच्या साहाय्याने त्याने गळफास घेतला आणि आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आला तेंव्हा कुटुंबाला मोठा धक्का बसला. एवढ्याशा मुलाने अशा प्रकारचा निर्णय कसा आणि कशासाठी घेतला याचे कारण मात्र समजू शकले नाही 

परंतु या घटनेने गावाला आणि परिसराला मोठा धक्का बसला आहे. अशा घटना समोर येतात तेंव्हा पालकांत देखील चिंतेचे वातावरण तयार होते. जिवनाचा अर्थ कळायच्या आधीच लहान मुले मृत्यूला जवळ करू लागली आहेत ही बाब प्रत्येक कुटुंबासाठी चिंता वाढविणारी ठरत आहे. 

पंढरपूर येथील अठरा वर्षे वयाच्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने केवळ गणित हा विषय अवघड जात असल्याच्या तणावातून पुणे जिल्ह्यात वसतीगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची एक दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. या घटनेची चर्चा होत असताना आणि हळहळ व्यक्त केली जात असताना पंढरपूर तालुक्यात सलग ही दुसरी घटना घडल्याचे समोर आले आहे.

पुळूज येथे घडलेल्या घटनेने अनेकांना धक्का बसला असून सदर घटनेबाबत सूरज अरुण होनकळस यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.  पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments