मोठी बातमी – ‘या’ कारणामुळे पुण्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय!
पुणे– यंदा जूनमध्ये दडी मारून बसलेला पाऊस जुलै महिन्यात जोरदार बारसतोय. यात काही दिवसांपासून पुणे शहरात पावसाचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. काही दिवसांपासून संततधार सुरु असलेल्या पावसाने पुणेकरांना चांगलंच झोडपलंय. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुण्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पुणे महापालिकेकडून यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीतील क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस पडत असून अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तविण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सर्व मनपा खाजगी शाळांना अनुदानित, विना अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित इ. शाळांना १४ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय पुणे पालिकेने घेतला आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजाच्या अनुषगांने शाळेत उपस्थित राहतील असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुरक्षेच्या कारणाने विद्यार्थी आणि शिक्षकांना १३ जुलै रोजी संध्याकाळी ४ नंतर घरी जाण्याची मुभा दिली आहे. तर दुसरीकडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील बालवाडी / प्राथमिक / माध्यमिक तसेच सर्व खासगी शाळांना १४ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली.


0 Comments