शहाजीबापू गाजविणार “चला हवा येऊ द्या”
एरव्ही सर्वसामान्य प्रेक्षकांना “चला हवा येवू द्या” कार्यक्रमातील कलाकारांचे आकर्षण असते. आता मात्र या कार्यक्रमातील कलाकारांनाच आ. शहाजीबापू पाटील यांची भूरळ पडल्याचे दिसून आले. विनोदवीरांनाच विनोदवीराचे आकर्षण असा हा सारा प्रकार आहे.
“काय झाडी… काय डोंगार.. काय हाटील… समदं एकदम ओक्के हाये..” ह्या सुपरहिट डायलॉगचे उद्गाते, मधाच्या जाळ्यामुळे राज्यात गाजत असलेल्या सांगोला तालुक्याचे कविमनाचे आमदार शहाजीबापू पाटील हे “चला हवा येवू द्या” या कार्यक्रमात झळकणार आहेत. या कार्यक्रमाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले असून ह्या विनोदी कार्यक्रमात शहाजीबापू हे कोणत्या गुणांची उधळण करणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
“काय झाडी… काय डोंगार.. काय हाटील… समदं एकदम ओक्के हाये..” ह्या सुपरहिट डायलॉगमुळे आमदार शहाजीबापू पाटील यांचे खूपच डिमांड वाढले. गुवाहाटी नाट्यानंतर काही दिवसांतच सत्तांतर झाले. बहुमत चाचणी होताच शहाजीबापू हे सांगोला येथे मतदारसंघात पोहोचले. ते सांगोला येथे येताच त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. एखादा-दुसरा दिवस शहाजीबापू हे सांगोला तालुक्यात थांबले असतील. दोनच दिवसांत त्यांना पुन्हा मुंबई गाठावी लागली. ABP Maza, Zee 24 Taas, News 18 Lokmat, BBC Marathi, Jay Maharashtra, Mumbai Tak, TV 9 Marathi आदी लोकप्रिय वृत्तवाहिन्यांनी मुलाखतीसाठी बोलावले. या सर्व वृत्तवाहिन्यांनी शहाजीबापूंच्या दीर्घ मुलाखती प्रसारित केल्या. वृत्तपत्रातून शहाजीबापूंवर रकानेच्या रकाने छापले जात आहेत. सोशल मीडियावर शहाजीबापू तुफान लोकप्रिय झाले आहेत. डिजिटल मीडियातही शहाजीबापू यांच्यावरील कंटेंटला मोठी मागणी आहे.
“चला हवा येवू द्या”च्या मंचावर
तुफान विनोदी कार्यक्रम “चला हवा येवू द्या”च्या मंचावर शहाजीबापू पाटील यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या शुटिंगसाठी आ. शहाजीबापू पाटील हे सपत्नीक मुंबईच्या स्टुडिओत हजर होते. या दोघांही दाम्पत्याला “चला हवा येवू द्या” या कार्यक्रमात काही प्रश्न विचारण्यात आले.
विशेषतः आ. शहाजीबापू पाटील यांनी या कार्यक्रमात राजकारणातील किस्से, डावपेच, नेत्यांचे आलेले अनुभव कथन केले आहेत. त्यातून हास्याचे कारंजे उडाले आहेत. अनेक राजकीय घटनांचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. या कार्यक्रमातून शहाजीबापू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू समोर येणार आहेत.
विनोदवीरांना विनोदवीराचे आकर्षण
एरव्ही सर्वसामान्य प्रेक्षकांना “चला हवा येवू द्या” कार्यक्रमातील अभिनेत्यांचे आकर्षण असते. आता मात्र या कार्यक्रमातील अभिनेत्यांनाच आ. शहाजीबापू पाटील यांची भूरळ पडल्याचे दिसून आले.
हा विशेष कार्यक्रम येत्या सोमवारी आणि मंगळवारी प्रसारित होण्याची शक्यता आहे. कार्यक्रमाचे शूटिंग सुरू असतानाची छायाचित्रे Think Tank ला मिळाली आहेत. या छायाचित्रात आ. शहाजी पाटील यांच्या समवेत डॉ. निलेश साबळे, कुशाल बद्रिके, भाऊ कदम दिसत आहेत.
लोकप्रिय मंचावर संधी
“चला हवा येऊ द्या” हा नितीन केणी निर्मित मराठी दूरचित्रवाणीवरील बहुचर्चित विनोदी कार्यक्रम आहे. सध्या झी मराठी वाहिनीवर हा कार्यक्रम सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता प्रक्षेपित केला जातो. या मालिकेचे दिग्दर्शन आणि निवेदन डॉ. निलेश साबळे करतात. ह्या तुफान विनोदी मालिकेत प्रमुख भूमिकेत भालचंद्र अर्थात भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे आदी कलाकार भूमिका करतात. काहीवेळा ह्या कार्यक्रमाचे सोमवार ते बुधवार / गुरूवार / शुक्रवार विशेष भाग अथवा रविवारी दोन किंवा तीन तासांचे विशेष भाग देखील दाखवले जातात. २०२० च्या दिवाळीपासून अभिनेते स्वप्नील जोशी हे या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून उपस्थित असतात.
https://youtu.be/30HlB5nYqJk
या मालिकेत मराठी रंगभूमी, मराठी मालिका आणि मराठी चित्रपट यातील कलाकार येतात आणि त्यांच्या आगामी चित्रपटाची, नाटकाची किंवा प्रसारित मालिकेची माहिती देतात. तसेच काहीवेळा या मंचावर अनेक हिंदी कलाकारांना देखील बोलावले जाते. ह्या मालिकेची मध्यवर्ती संकल्पना थुकरटवाडी या गावातील घडणाऱ्या गमती जमतींवर आधारित आहे. थुकरटवाडी गावाचा पोस्टमन आलेल्या पाहुण्या कलाकारांसाठी त्यांच्या नातलगांनी पाठवलेली पत्रे घेऊन येतो आणि विशिष्ट शैलीत ती वाचूनही दाखवतो. ही पत्रे अरविंद जगताप लिखित असतात.
https://youtu.be/3ks-xPh18GE
प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला हा सुप्रसिद्ध काॅमेडी शो आहे. निलेश साबळे, भालचंद्र कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि तुषार देवल यांनी मिळून सुरू केलेला हा कार्यक्रम आहे. याबरोबरच योगेश शिरसाट, अंकुर वाढवे, स्नेहल शिदम, उमेश जगताप, अरविंद जगताप हे सहकलाकार असून रमेश वाणी, विनीत भोंडे, शशिकांत केरकर, मानसी नाईक, संदीप रेडकर यांनी देखील यात काम केलेले आहे. हा कार्यक्रम नाटक, चित्रपट, मालिका यांना प्रोत्साहित करण्याचे काम करतो.
https://youtu.be/z4SjAEM72AY


0 Comments