सांगोला तालुक्यातील घटना साखरपुड्यातच बालविवाहाचा डाव उधळला
सांगोला , दि . २५ जुलै सांगोला पोलिसांच्या सतर्कते मुळे साखरपुड्यातच नियोजित होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखून पोलिसांनी सुटकेचा निःश्वास घेतला . बालसंरक्षण अधिकारी , सरपंच , पोलीस अधिकारी यांनी मुला मुलींच्या नातेवाईकांना बालविवाह प्रतिबंधक कायदा व तरतुदीबाबत माहिती देऊन समुपदेशन केले . दोन्ही बाजूकडील मनपरिवर्तन झाल्यानंतर तसे त्यांचे लेखी जाब जबाब घेऊन दोन्हीही वन्हऱ्हाडी मंडळींना सोडून देण्यात आले .
ही घटना काल सोमवारी पाचेगाव खुर्द , ( ता सांगोला ) येथील जिल्हा परिषद शाळेजवळ उघडकीस आली होती . पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना पाचेगाव खुर्द ( ता . सांगोला ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ अल्पवयीनमुलीचा साखरपुड्यातच विवाह उरकला जात असल्याचे गोपनीय माहिती मिळाली होती . त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर , पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास बनसोडे , पोलीस नाईक प्रकाश कोष्टी , म हिला पोलीस कॉन्स्टेबल बुरले असे मिळून सदर ठिकाणी गेले असता साखरपुड्यातच बालविवाहाचा कार्यक्रम चालू होता .
विवाह सदृश्य परिस्थिती दिसून आल्याम ळे सपोनि काटकर यांनी महिला पोलिस कॉन्स्टेबल ताई बुरले यांना पाटावर जोडीला बसलेल्या अल्पवयीन मुलीस बाजूला घेवून नाव पत्त्याबाबत विचारणा केली असता तिने तिचे नाव गौरी आनंदा लोखंडे तर मुलाचे नावश्रीकांत राजेंद्र कांबळे ( वय २३ ) असल्याचे सांगितले . उपस्थित नातेवाईकांकडे मुलीच्या जन्म तारखेच्या पुराव्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी पुरावा देण्यास असमर्थता दर्शविली म्हणून पोलिसांनी मुलीच्या शिक्षणाबाबत संबंधित शाळेत चौकशी केली असता ती इयत्ता नववीत शिक्षण घेत असल्याचे समजले .
पोलिसांनी मुलीची आई , नवरदेव श्रीकांत कांबळे सह त्याच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनला आणले . पोलीस स्टेशनला बाल संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण , सरपंच रामचंद्र मिसाळ यांच्यासह गावातील प्रतिष्ठितांच्या समक्ष कांबळे व लोखंडे परिवारास बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी व बालविवाहाबाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण माहिती देऊन बालविवाह कसा चुकीचा असल्याबाबत समुपदेशन केले . अखेर त्यांचे मन परिवर्तन झाल्यानंतर तसे लेखी जबाब घेऊन त्यांना सोडून दिले .


0 Comments