राजकारणातील भीष्मपितामह स्व.भाई गणपतराव देशमुख
सांगोला/ देशातील विक्रमादित्य आमदार स्व.भाई डॉ.गणपतराव देशमुख यांचा तिथीनुसार आज बुधवार, २० जुलै २०२२ रोजी प्रथम पुण्यस्मरणदिन आहे. त्यांचे निधन गतवर्षी ३०जुलै २०२१ रोजी सोलापूर येथे झाले होते. तिथीनुसार आज असलेल्या पुण्यस्मरणदिनानिमित्त विशेष लेख.
सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते भाई स्व.गणपत देशमुख यांनी इतिहास रचला. ते रोहयो मंत्री असताना त्यांनी शेतकरी, कष्टकरी जनतेला काम दिले. विधिमंडळातील कामे, अभ्यासू मुद्दे अनेकांना निशब्द करणारे होते. अशातच त्यांचे 30 जुलै 2021 रोजी निधन झाले.
तब्बल ११ पंचवार्षिक निवडणुकांत विजय प्राप्त केला. भाई गणपतराव देशमुख यांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. भाई गणपतराव देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर १९७२ आणि १९९५चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच निवडून दिले. २०१२मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विधीमंडळ सभागृहाने त्यांचा गौरव केला होता.
भाई गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवर होते. १९७८मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केल्यावर आणि १९९९मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. त्यावेळेस त्यांनी दुष्काळी भागाच्या पाण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते.
पाण्यासाठी अविरत संघर्ष
भाई गणपतराव देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून दुष्काळी भागामध्ये अनेक पाणी परिषदा घेतल्या. या पाणी परिषदांमध्ये भाई एन. डी. पाटील, नागनाथ अण्णा नायकवडी, जयंत पाटील असे अनेक वरिष्ठ नेते सहभागी होते. या पाणी परिषदेचे फलित म्हणजे दुष्काळी भागातील अकरा तालुक्यांमध्ये आता प्रत्यक्षात पाणी पोचण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.


0 Comments