मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त नाहीच; नव्या मुख्यमंत्र्याची पुन्हा एकदा दिल्लीवारी
मुंबई – शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. मात्र, 27 दिवस उलटूनही मंत्रिमंडळाच्या विस्ताराला कोणताच मुहूर्त अजून मिळालेला नाही. त्यामुळे आज रात्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे एकटेच दिल्लीला निघणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात यंदा अनेक मोठमोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन तब्बल 27 दिवस उलटले. नवीन सरकार स्थापन झाले तरी तरी मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप होऊ शकला नाही. त्यातल्या त्यात शिंदे आणि भाजपच्या गोटातच मंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झालेली पाहायला मिळतेय. दुसरीकडे, 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची अद्याप कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे, पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी आज रात्री दिल्लीला रवाना होतील.
दरम्यान, मुख्यमंत्री या भेटीदरम्यान मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. याशिवाय 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात होत असलेल्या आमदार अपात्र सुनावणी संदर्भातही चर्चा करणार आहे. याआधीही एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते. मात्र, 12 तास प्रतिक्षा करूनही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिंदे यांना भेट दिली नाही. त्यानंतर राष्ट्रपतिपदाच्या शपथविधी सोहळ्याला फडणवीस आणि शिंदे हे एकत्रच दिल्लीला गेले होते. आता पुन्हा एकदा शिंदे दिल्लीला जाणार आहेत. एकाच महिन्यात शिंदे यांची ही चौथी दिल्लीवारी आहे.
एकनाथ शिंदे यांनी सेनेविरोधात बंद केल्यानंतर शिवसेनेच्या 40 आणि अपक्ष अशा जवळपास 50 पेक्षा जास्त आमदारांनी त्यांना साथ दिली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मागच्या सरकारमधले 8 मंत्रीही सहभागी होते, त्यामुळे त्यांनाही नव्या मंत्रिमंडळात आपल्याला स्थान असेल अशी अपेक्षा आहे.


0 Comments