नोकर भरतीबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश…!!
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे.. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे राज्यातील नोकर भरतीची प्रक्रिया रखडलीय. त्यामुळे विकासकामांना मोठ्या प्रमाणात खीळ बसली आहे. ही बाब लक्षात घेऊन शिंदे सरकारने ही रखडलेली नोकर भरतीची प्रक्रिया लवकरच सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोकर भरतीचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला आहे. विविध विभागातील रिक्त पदांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विकासकामे मार्गी लागणे अशक्य असल्याचे सांगत या भरतीची कागदपत्रे त्वरित सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
पावणे तीन लाख जागा रिक्त
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना, त्यांच्या काळात राज्यात 36 हजार पदांची भरती झाली होती. त्यानंतर कोरोनाचे संकट व राजकीय घडामोडींमध्ये ही भरती प्रक्रिया रखडली. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात तब्बल 2 लाख 75 हजार पदे रिक्त आहेत. त्यात ‘अ’ वर्गात 50 हजार, ‘ब’ वर्गात 75 हजार, ‘क’ वर्गात 1 लाख, तर ‘ड’ वर्गात 50 हजार पदे रिक्त आहेत. गृह विभागात 14 ते 15 हजार, सार्वजनिक आरोग्य विभागात 24 हजार (8 हजार पदभरतीची प्रक्रिया सुरू), जलसंपदा व महसूल विभाग प्रत्येकी 14 हजार, वैद्यकीय शिक्षण 12 हजार, सार्वजनिक बांधकाम 8 हजार व अन्य विभागांतील 12,500 कर्मचारी पहिल्या टप्प्यात भरले जातील.
दर महिन्याला 1 लाख भरती
जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसाठीही कर्मचारी नेमले जाणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर केला जाईल. येत्या ऑगस्ट, सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात दर महिन्याला एक लाख पद भरती केली जाणार आहे.. रिक्त जागा व मंजूर जागांचा आढावा घेऊन आरक्षण व बिंदूनामावलीनुसार ही भरती केली जाईल..
खरं तर महाविकास आघाडी सरकारनेच भरतीची प्रक्रिया सुरु केली होती. मात्र, नंतर अचानक सत्ताबदल झाला.. आता शिंदे सरकारने रखडलेली भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.. त्यानुसार, जाहिराती तयार करून त्या मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवल्या जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील एका अधिकाऱ्याने दिली..


0 Comments