google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुरातील व्यक्तीचा पुण्यात धारदार शस्त्राने खून

Breaking News

सोलापुरातील व्यक्तीचा पुण्यात धारदार शस्त्राने खून

 सोलापुरातील व्यक्तीचा पुण्यात धारदार शस्त्राने खून 

पुणे शहरातील यवत येथे संत तुकाराम महाराज पालखी तळाच्या सभागृहात एका ४७ वर्षीय पुरुषाचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खून झाला आहे. तो व्यक्ती सोलापूर शहरातील आहे.काल सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मंदिराच्या समोरच असलेल्या पालखी तळावर रात्री उशिरा खून झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.


संजय सखाराम बनकर (वय ४६, रा. मुरारजी पेठ, चिंचनगर, सोलापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृतांची पत्नी मनीषा संजय बनकर (रा. खामगाव, तांबेवाडी, ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मात्र, खुनामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी यवतचे पोलीस दाखल झाले. बनकर यांची पत्नी मनीषा हिचे माहेर खामगाव , तांबेवाडी (ता. दौंड) येथील असून ती मागील काही वर्षांपासून माहेरी राहत होती.


संजय बनकर सोलापूर येथे त्यांच्या आईकडे राहत होता. मात्र अधून मधून तो त्याच्या पत्नीकडे येत असे. मागील तीन ते चार दिवसांपूर्वी तो सोलापूर येथून आला होता.

बुधवारी सकाळी यवत येथील पालखी तळात एका व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार , सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरगोजे व पोलीस पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली. 


संबंधित व्यक्ती मृत झाल्याचे आढळून आले. तसेच त्याच्या पोटात धारदार शस्त्राने तीन ते चार वार केल्याचेही आढळून आले. मिळालेल्या मोबाईल वरून त्याची ओळख पटवण्यास मदत झाली. खून झालेल्या व्यक्तीचा मोबाईल व इतर पुराव्यांवरून मारेकऱ्यांचा तपास यवत पोलिसांनी सुरु केला. मध्यरात्री १२ ते ४ दरम्यान खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


यवत येथील महालक्ष्मी मातेची आखाड यात्रा प्रचंड मोठी आणि प्रसिद्ध असून मुंबई, पुणे सह आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी व यात्रेसाठी येत असतात. आषाढी एकादशी झाल्यानंतर येणाऱ्या मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी येथे मोठी यात्रा भरते. काल रात्रीच्या वेळी गर्दी असताना मंदिरासमोरील बाजार मैदानात पालखी तळमध्ये खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments