माणसातील देव माणूस ; आमचे आबासाहेब
विचारांची पक्की असणारी माणसं नेहमीच अजरामर होतात. राजकीय क्षेत्रात एक उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले, राजकारणातील राजहंस, सर्वसामान्यांचे आधारवड व माणसातील देवमाणूस म्हणूनच ‘आमचे आबासाहेब’ ओळखले जात होते.
आबासाहेबांच्या दुःखद् निधनाने एक वर्ष निघून गेले हे अजूनही कळत नाही. आजही ‘आबासाहेब’ आमच्या सोबतच आहेत असा भास सातत्याने होतोय.
तब्बल ५५ वर्षे विधिमंडळाचे सभागृह गाजवणारे ‘आबासाहेब’ हे एक अद्भूत असे न संपणारे रसायन होते. स्वर्गीय आबासाहेबांनी राजकारण आणि समाजकारण करत असताना मूल्य जोपासले आणि राजकीय तत्त्वांना नेहमीच स्वीकारले. आबासाहेबांनी सर्वात प्रथम १९६२ साली पहिली निवडणूक लढवली. त्यानंतर तब्बल ११ निवडणुकीमध्ये विजय मिळवून विक्रम केला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंतचा महाराष्ट्राचा आणि देशाचा राजकीय प्रवास जवळून पाहणारे भीष्म पितामह स्व. आबासाहेब होते. सांगोला तालुक्याच्या चौफेर विकासामध्ये ८१ गावची शिरभावी पाणीपुरवठा योजना आज संपूर्ण तालुक्यामध्ये घराघरांमध्ये पिण्याचे पाणी पोहोचवले आहे.
स्वर्गीय आबासाहेबांनी शेतकरी सहकारी सूत गिरणी, महिला सूत गिरणी, जिल्हा दूध संघ, बाजार समिती, महाराष्ट्र औद्योगिक विकास, छोट्या मोठ्या बँका, पतसंस्था, • सांगोला तालुक्याचा शैक्षणिक विकास व्हावा म्हणून सांगोला तालुका शेतकरी शिक्षण मंडळाची स्थापना केली. संपूर्ण सांगोला तालुका प्रत्येक वाड्या-वस्तीवर पक्क्या रस्त्यांचे जाळे – विणले- राजकारण करत असताना तत्त्वाचा, निष्ठेचा आणि निस्वार्थीपणाचा आदर्श नेहमीच आपल्या बोलण्यातून, चालण्यातून आणि वागण्यातून आबासाहेबांनी घालून दिला. स्वर्गीय आबासाहेबांनी नेहमीच पुरोगामी तत्वाचा स्वीकार केला. उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे की, पक्षनिष्ठा काय असते, राजकारणातील मूल्य काय असतात, हा आदर्श उभा महाराष्ट्र आज बदलत्या राजकारणात आबासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
सांगली – सातारा – सोलापूर तेरा दुष्काळी तालुक्यांना पिण्याचे पाणी आणि शेतीचे पाणी मिळावे म्हणून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्याबरोबर त्यांनी पाणी प्रश्नासाठी मोठा लढा व संघर्ष उभा केला. अनेकदा आंदोलने, उपोषणे, मोर्चे काढले. त्याचा परिणाम म्हणून टेंभू, ताकारी, म्हैसाळ, उरमेडी यासारख्या उपसा सिंचन योजनांतून आज शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये पाणी येऊन ठेपले आहे. मात्र पाणी आले म्हणून सांगोल्याचा दुष्काळ हटला असे होत नाही. या योजना बारमाही सुरू राहिल्या पाहिजेत. पाण्याची आवर्तने नियोजनपूर्वक सुरू राहिले पाहिजेत. लोकांना पाण्याचे योग्य वाटप झाले पाहिजे.
आबासाहेब जरी आपल्या सोबत नसले तरी आबासाहेबांचे विचार निश्चितपणाने येथून पुढील काळामध्ये सर्व लोकांना एकत्रित घेऊन, सर्व समाजातील लोकांना विचारात घेऊन सांगोला तालुक्याचा बदललेला चेहरा नव्या जोमाने नव्या हिमतीने निश्चितपणाने सर्वांच्या सहकार्याने स्व. आबासाहेबांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करूया आणि हीच खरी स्व. आबासाहेबांना श्रद्धांजली. शेवटी एवढंच सांगावेसे वाटते,
‘आदर्श आहे व्यक्तिमत्व, आदर्श सांगावे किती
अनमोल आहे रत्न, मोल सांगावे किती .. ?’
डॉ. भाई बाबासाहेब देशमुख
प्रदेशाध्यक्ष, पुरोगामी युवक संघटना, महाराष्ट्र


0 Comments