अनैतिक संबधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच केला खून!
मुंबई : अनैतिक संबधास अडसर ठरणाऱ्या पतीचा वायरने गळा आवळून पत्नीने खून केला. त्यानंतर मृतदेह घरातील बेडमध्ये लपवून ठेवला. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पत्नीला सोमवारी रात्री अटक केली. नसीम शेख (वय २२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर रूबीना शेख असे संशयित आरोपी पत्नीचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मृत नसीम शेख याचा २०१७ साली रूबीना शेख नामक महिलेशी विवाह झाला होता. नसीम हा टेलरिंगचे काम करत होता. नसीमची पत्नी रूबीना हिचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबध होते. याची कुणकुण नसीमला लागली होती. नसीम हा रूबीनाच्या अनैतिक संबधाला अडसर ठरत होता. त्यामुळे रूबीनाने १४ जुलैला रात्री वायरने नसीमचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिने मृतदेह घरातील लाकडी बेडमध्ये लपवून ठेवला. आणि आपल्या माहेरी निघून गेली. दोन तीन दिवसानंतर शेजाऱ्यांना घरातून वास येत असल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. १४ जुलै रोजी नसीम याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी लाकडी बेडमध्ये आढळून आला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. नसीम याचा गळा आवळून खून झाल्याचा अहवाल शवविच्छेदनातून पोलिसांना प्राप्त झाला. यानंतर पोलिसांनी नसीमच्या पत्नीला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी असता, तिने आपला गुन्हा कबूल केला. या हत्येत रुबीनासह अन्य आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून साकीनाका पोलिस याबाबत अधिकचा तपास करत आहेत.


0 Comments