महाराष्ट्रासह देशभरात ‘आरे वाचवा’ आंदोलन
मुंबई : ‘आरे वाचवा’ आंदोलनाच्या आवाहनाला नागपूरसह आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, बिहार, केरळ आणि तेलंगणा येथील पर्यावरणवाद्यांनी प्रतिसाद देत ‘आरे वाचवा’ आंदोलन केले. आरेतील पिकनिक पॉइंटसह गोरेगाव रेल्वे स्थानकावरही निदर्शने करण्यात आली.
आरेत कामावरील बंदी उठवून राज्य सरकारने आरेत कारशेड बांधण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. त्यामुळे आता ‘आरे वाचवा’ आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी आरे वाचवण्यासाठी रविवारी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला देशभरातील पर्यावरणवाद्यांनी प्रतिसाद देत ‘आरे वाचवा’चा नारा दिला. जवळपास ११ राज्यांमध्ये आरेसाठी आंदोलन करण्यात आले. एकीकडे देशभरातील पर्यावरणवाद्यांना आरे वाचविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले जात असतानाच मुंबईतील आंदोलन अधिक व्यापक करण्यात आले आहे.
‘आरे वाचवा’ आंदोलकांनी आता आपला आवाज राज्य सरकारपर्यंत तीव्रतेने पोहचवण्यासाठी मुंबईभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आतापर्यंत आरेतील पिकनिक पॉइंटवरच आंदोलन केले जात होते.
मात्र, रविवारी गोरेगाव रेल्वे स्थानकावर लोकल अडवून आंदोलन करण्यात आल्याची माहिती आरे संवर्धन गटाकडून देण्यात आली. त्याचबरोबर केवळ रविवारीच नव्हे तर इतर दिवशीही सरकारविरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यानुसार घाटकोपरमध्ये लवकरच मोठे आंदोलन होणार असून मुंबईत ठिकठिकाणी आंदोलने व निदर्शने करण्याचे नियोजन सुरू आहे.


0 Comments