"त्या" आमदारांचे आठ दिवसांचे बिल थक्क करणारे !
काय झाडी... काय डोंगार.... काय हाटील ... असं वर्णन गाजलेल्या गुवाहाटीच्या त्या हॉटेलचे आमदारांचे आठवड्याचे बिल ९० लाखाच्या घरात गेल्याची माहिती मिळत असून सदर हॉटेलचे हे बिल आमदारांनी चुकते देखील केले आहे.
शिवसेनेतून बंड करून गेलेले आणि अपक्ष असे पन्नास आमदार राज्यातून सुरतला गेले आणि तेथून ते आसाममधील गुवाहाटीला गेले. गुवाहाटीत हे आमदार थांबले होते पण राज्याच्या राजकारणात भूकंप निर्माण झाला आणि अखेर राज्यात सत्तांतर देखील झाले. सुरतवरून अनेक वेळा चॉपर विमानाच्या गुवाहाटीला चकरा देखील झाल्या तर आमदार आणि त्यांचे सहकारी राहिलेल्या पंचतारांकित हॉटेल 'रेडीसन ब्लू' चे बिल किती येत असेल याचीही राज्यात रोज चर्चा चालत राहिली. हॉटेलचा खर्च, विमानांचा खर्च किती असेल आणि तो कोण देत असेल ? हा प्रश्न राज्यातील सर्वसामान्य जनतेच्याही औत्सुक्याचा बनला होता. एवढा मोठा खर्च कुणी केला असेल याचा अंदाज राज्यातील प्रत्येक नागरिकाला आलेलाच आहे पण हा खर्च मात्र प्रचंड असणार आहे याची सर्वांनाच जाणीव आहे. "काय झाडी... काय डोंगार.... काय हाटील ...समदं ओक्केमंदी हाय" हे आमदार शहाजीबापू पाटील यांचे एकच वाक्य बोलके आहे.
आमदार आणि त्यांचे समर्थक आसामच्या हॉटेल रॅडिसन ब्लू मध्ये आठ दिवस थांबले होते. राज्यातून हे आमदासर सूरतला गेले आणि तेथून ते विमानाने गुवाहाटी येथे गेले होते. आठवडाभर थांबून ते परत येताना पुन्हा गोव्याच्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. हा सर्व खर्च वेगळा असून केवळ गुवाहाटी येथील हॉटेलचे बिल ९ लाखावर गेल्याचे समजते. सदर आमदारांनी हॉटेलचे बिल दिले असल्याचे हॉटेल कर्मचाऱ्याने सांगितले असले तरी हे बिल नेमके किती झाले याची माहिती मात्र त्याने दिली नाही. असे असले तरी हॉटेलचे भाडे हे ७० लाखाच्या जवळ असल्याचे सांगितले जात आहे.
संपूर्ण हॉटेल ताब्यात !
हॉटेल रॅडिसन ब्लूच्या ७० खोल्या या बंडखोर आमदारांनी बुक केल्या होत्या आणि या दरम्यान या हॉटेलमध्ये अन्य कुणालाही राहण्यास परवानगी नव्हती. २२ जून पासून २९ जून पर्यंत आमदाराशिवाय अन्य कुणासाठीही हॉटेल खुले नव्हते. अर्थातच आमदार आणि त्यांचे समर्थक यांच्याशिवाय या हॉटेलमध्ये कुणीही प्रवेश करू शकले नाही की तेथील सुविधांचा लाभ घेऊ शकले नाहीत. आमदारांचे हॉटेलचे भाडेच ७० लाखांच्या आसपास गेल्याचे सांगितले जाऊ लागले आहे.
जेवणाचे २२ लाख वेगळे !
हॉटेलचे भाडे ७० लाखांच्या आसपास गेल्याचे सांगण्यात येत असले तरी यात आमदार आणि त्यांच्या समर्थकांच्या खाण्यापिण्याचे बिल यात समाविष्ठ नाही. आमदार महोदयांचे जेवणाचे बिल २२ लाखावर गेले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे या हॉटेलचा खर्च ९० लाखावर गेला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


0 Comments