सांगोला तालुक्यातील बहुतांश गावातून विधवा महिला सन्मानार्थ ग्रामसभा संपन्न
सांगोला/प्रतिनिधी: विधवा महिलांच्या सन्मानार्थ महाराष्ट्रभर बदलाचे वारे सुरु आहे. पुरोगामी विचार पुढे घेऊन जाण्यात सांगोला तालुका नेहमी अग्रेसर राहिला आहे. संस्थेने केलेल्या प्रतिसादाला आवाहन म्हणून सांगोला तालुक्यातील बहुतांश गावातून विधवा महिला अनिष्ट चालीरिती आणि प्रथा बंद करण्याच्या उद्देशाने ग्राम सभा व ठराव करण्यात आले आहेत.
या ग्रामसभेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती झालेली असून प्रत्येक गावाने विधवा महिलांच्या सन्मानासाठी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ललित बाबर यांनी सांगितले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी डॉ. आंबेडकर संस्थेने प्रमोद झिंजाडे यांच्या उपस्थितीत सांगोला या ठिकाणी विधवा महिला सन्मान परिषद आयोजित केली होती. समाजातील विधवा महिलांचा सन्मान सर्व ठिकाणी करण्यात यावा व विधवा महिला प्रती असलेल्या अनिष्ठ चालीरीती- परंपरा याला प्रतिबंध व्हावा व समाजात मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती व्हावी यासाठी सर्व ग्रामपंचायत स्तरावर विधवा प्रथा बंद करणे बाबत ठराव करण्यात यावा. विधवा प्रथा बंदी शासन निर्णयाचे रुपांतर कायद्यात करण्यात यावे.
विधवा, परितक्त्या व अपंग व वृद्ध यांना मिळणाऱ्या पेन्शन मध्ये सरसकट वाढ करून ती ४००० रु करण्यात यावी तसेच पेन्शन योजनेतील मुलांच्या वयाची अट रद्द करण्यात यावी आणि वृद्धापकाळ पेन्शन योजनेसाठी वयाची अट ५५ वर्षा पर्यंत शिथिल करावी. विविध योजनेमध्ये विधवा महिलांना लाभार्थी म्हणून प्राधान्यक्रम देण्यात यावा व घरकुल योजनेचा निधी वाढवून तो ३ लाख रु पर्यंत करावा. बाल व महिला(लिंगभाव) अनुकूल ग्रामपंचायत स्थापित करण्यात यावी. या संदर्भातले ठराव करण्यात आले होते.
तसेच विशेष ग्राम सभा आयोजित करून मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती व ठराव करण्यात यावे अशी मागणी या परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली होती. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सांगोल्याचे गट विकास अधिकारी श्री. आनंद लोकरे यांनी दिनांक १ जुलै रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्या संदर्भात परिपत्रक काढले होते. या परिपत्रकानुसार सांगोला तालुक्यातील बहुतांश गावात ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्राम सभांच्या माध्यमातून २००० पेक्षा जास्त लोकांनी विधवा महिला सन्मान करण्याबाबत शपथ घेतली आहे.
या विशेष ग्राम सभा आयोजित करण्यासाठी तालुक्याच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी, संपर्क अधिकारी, सुपरवायजर, सहाय्यक गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, ग्राम सेवक/ ग्राम विकास अधिकारी , अंगणवाडी सेविका, आशा सेविका , आरोग्य कर्मचारी, विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेऊन ग्रामसभा यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले असून अभिनंदास पात्र आहेत.
परंपरेच्या प्रथेनुसार पुरुषाच्या मृत्यूनंतर दु:खात बुडालेल्या त्याच्या पत्नीला त्याच वेळी, कपाळीचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र व जोडवी काढणे, बांगड्या फोडणे, या दु:खदायक प्रकारांची सक्ती केली जाते. पुढील काळात तिला सणसमारंभात, धार्मिक विधीमध्ये सहभागी होण्यास मनाई असते. गौणपणा आणि अपराधी भावना वाढवणा-या अशा अनुभवांना सामोरे जाण्याचे प्रसंग तिच्यावर अनेकदा येतात. या अनिष्ट प्रथा बंद व्हाव्यात, यासाठी महाराष्ट्रात बदलाचे वारे सुरू झाले आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला चालना देण्यासाठी जेष्ठ समाजसेवक श्री. प्रमोद झिंजाडे यांनी पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने अशा प्रथांना प्रतिबंध म्हणून शासन निर्णय पारित केला आहे. मात्र मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती झाल्याची दिसत नव्हती. विधवा महिलेला सन्मानाने जगता आले पाहिजे.पतीच्या निधनानंतर ताबडतोब केले जाणारे मानहानिकारक विधी बंद करून तिचाही सन्मान करणे आवश्यक आहे. पतीच्या निधनानंतर विशिष्ट रंगाची वस्त्रे, साधने, अलंकार, वापरणे/न वापरणे यांची तिच्यावर सक्ती हि तिच्या आत्मसन्मानाला ठेच पोचवणा-या आहेत. अशा कोणत्याही सक्तीला सामाजिक व कायदेशीर मान्यता असता कामा नये. धार्मिक, सार्वजनिक विधी करण्या/न करण्याची मोकळीक तिला असली पाहिजे.
यासाठी व्यापक पातळीवर समाजप्रबोधन आवश्यक आहे.सांगोला तालुक्यातील बहुतांश ग्राम पंचायतीने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. येणाऱ्या काळात विधवा व वंचित घटकांच्या महिलांना त्यांचे हक्क, अधिकार आणि सन्मान मिळवून देण्याच्या अनुषंगाने तालुक्यात या विशेष ग्रामसभेचे मोठे योगदान राहणार आहे. विधवा महिलांच्या सन्मानार्थ १०० टक्के ठराव करणारा तालुका म्हणून सांगोल्याचे नाव देशभर होणार आहे. गट विकास अधिकारी यांनी विशेष ग्राम सभेचा निर्णय कौतुकास्पद आहे. येणाऱ्या काळात विधवा महिला सन्मानासाठी व त्यांचे हक्क आणि अधिकार सुरक्षित रहावेत या साठी संस्था काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
घेरडी व लोटेवाडी गावच्या पुढाकारा नंतर सांगोला तालुक्यातील इतर गावातून विधवा प्रथा बंदी बाबत ठराव करण्यासाठी सांगोला पंचायत समितीने पाऊल उचलून १ जुलै रोजी विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. महापुरुषांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपत सांगोला तालुक्यातील सर्वच गावांनी केलेले काम कौतुकस्पद आहे.समाजात विधवा महिला सन्मानाप्रती व्यापक पातळीवर जनजागृती साठी मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले होते.विधवा महिलांच्या सन्मानासाठी मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती व ग्रामसभा आयोजित सांगोला तालुका अग्रेसर राहिला आहे. : आनंद लोकरे, गट विकास अधिकारी सांगोला
विधवा महिलांच्या सन्मानासाठी व व्यापक स्वरुपात जनजागृती व्हावी यासाठी पंचायत समिती पातळीवर नियोजन करण्यात आले होते.ग्रामसभांचे आयोजन यशस्वी व्हावे या साठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. मा. गटविकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, परीवेक्षका व गाव पातळीवर सर्व विभागाच्या कर्मचारी यांनी काम पाहिले आहे. : आसमा आतार, बाल विकास प्रकल्प अधिकारी सांगोला*
डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था समाजातील विधवा व वंचित घटकांच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहे. संस्थेने आयोजित केलेल्या विधवा महिला सन्मान परिषदेच्या माध्यमातून केलेल्या ठरावाला यश आले असून मोठ्या प्रमाणात ग्राम सभा आयोजित केल्या गेल्या. या साठी संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी व विविध संस्था संघटना यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. : नंदू मोरे , डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था सांगोला



0 Comments