google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शिंदे- फडवीस सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या !

Breaking News

शिंदे- फडवीस सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या !

 शिंदे- फडवीस सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या !

महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यापासून आधीचे निर्णय स्थगित करण्याचा सपाटाच लावला असताना शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून २३ दिवसांत राज्यातील ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.


कुठल्याही पक्षाचे सरकार असले तरी शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत परंतु शासनाने काही आश्वासक धोरण अवलंबल्यास काही काळ तरी आत्महत्या कमी होतात. विविध कारणांनी शेतकरी बांधव आपल्या आयुष्याचा शेवट करीत असले तरी आर्थिक नाकेबंदी हेच प्रमुख कारण आत्तापर्यंत समोर आले असून मराठवाडा, विदर्भात आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याचे वर्षानुवर्षे दिसून आले आहे. राज्यात ठाकरे सरकार खाली खेचून शिंदे - फडणवीस यांचे सरकार आरूढ झाले आहे पण अजून मंत्रीमंडळ विस्तार नसल्याने राज्यातून टीका होतच आहे. केवळ 'सत्तेसाठी वाट्टेल ते' असा प्रकार सुरु असल्याचे आरोप देखील होत आहेत. या सरकारचे भवितव्य न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असून केवळ घोषणा आणि स्थगिती यावर जनतेचा विश्वास नसल्याचे प्रतिबिंब उमटू लागले आहे. त्यातच शेतकरी आत्महत्येचे गेल्या २३ दिवसातील आकडे हे धक्कादायक आहेत. 


नुकताच १ जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात आला आणि यावेळी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र ' हा संकल्प जाहीर देखील केला आहे. या संकल्पाचा सकारात्मक परिणाम दिसण्याऐवजी त्यानंतरच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढीला लागल्या असल्याचे आकडे समोर आले आहेत. शिंदे- फडणवीस या दोघांच्याच सरकारने काही घोषणा केल्या आणि ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयाला स्थगिती देण्याचा सपाटा लावला पण राज्यात शेतकरी मात्र आत्महत्या करीतच आहेत. या आत्महत्याबाबत मात्र काही पाऊल उचललेले दिसत नाही.  शिंदे -फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून २३ दिवसातल्या ८९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या या निश्चितच चिंता वाढविणाऱ्या ठरल्या आहेत. 


राज्यात झालेल्या ८९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या या औरंगाबाद, बीड, यवतमाळ या जिल्ह्यात अधिक असून राज्याला अद्याप कृषीमंत्रीच नाही. महाराष्ट्रासारख्या राज्याला जवळपास चार आठवड्यापासून कृषीमंत्री नसल्याने शेतकरी वाऱ्यावर असल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सत्ता टिकविण्यात आणि शिवसेना काबीज करण्यात गुंतले असल्याचे आरोप रोज होत आहेत. या काळात त्यांनी दोन वेळा दिल्लीचा दौरा केला आहे.


 अधिकारीवर्गाशी ते बोलून सूचना करीत असल्याचे व्हिडीओ मात्र महाराष्ट्र सतत पाहत आहे आणि यावर राजकीय टीका देखील होत राहिली आहे. शिंदे- फडणवीस या दोघांच्याच सरकारच्या तीन 'मंत्रीमंडळ ' बैठका झाल्या, यात अनेक निर्णय घेण्यात आले पण शेतकरी बांधवाना दिलासा मिळेल असा एकही निर्णय घेण्यात आलेला नाही. जनतेतून थेट सरपंच निवड, आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्याना पेन्शन,एमएमआरडीए च्या कर्जाची हमी, विमानतळाचे नामकरण अशा घोषणा करीत ठाकरे सरकारचे काही महत्वाचे निर्णय रद्द करण्यात आले. शेतकऱ्यांच्या जीवनात काही बदल घडून येईल अशा एकही निर्णयाचा यात समावेश नाही. 


 अशा शेतकरी आत्महत्या !शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून औरंगाबाद १५, बीड- १३, यवतमाळ - १२, अहमदनगर - ७, जळगाव - ६, जालना- ५, बुलढाणा - ५  उस्मानाबाद - ५, अमरावती - ४, वाशीम - ४,  नांदेड- २, अकोला- ३, भंडारा-चंद्रपूर - २  अशा शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.  जानेवारी ते जून या काळात मराठवाड्यात २०६ आणि विदर्भात २६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून गतवर्षीच्या तुलनेतील हा अधिकचा आकडा आहे. मागील ठाकरे सरकारमध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्री होते.

Post a Comment

0 Comments