google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वामन मेश्राम यांची “बामसेफ”मधून हकालपट्टी?

Breaking News

वामन मेश्राम यांची “बामसेफ”मधून हकालपट्टी?

वामन मेश्राम यांची “बामसेफ”मधून हकालपट्टी?

वामन मेश्राम यांच्या  बाजूने बामसेफने याबाबत सविस्तर खुलासा देत ज्या दोन व्यक्तींनी हे पत्र व्हायरल केले आहे त्यांना यापूर्वीच वामन मेश्राम यांनी पक्षविरोधी कृतीबद्दल निलंबित करून पक्षातून काढून टाकले असल्याचे म्हटले आहे.


‘बामसेफ’चे नेते वामन मेश्राम यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘बामसेफ’चे राष्ट्रीय अध्यक्ष कमलाकांत काले व राष्ट्रीय महासचिव मांजीभाई राठोड यांची या पत्रावर सही आहे. दरम्यान, वामन मेश्राम यांच्याबाबत व्हायरल झालेले हे पत्र म्हणजे जातीयवादी लोकांनी केलेले षडयंत्र असल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ यांनी “थिंक टँक”शी बोलताना केला आहे.


दरम्यान, वामन मेश्राम यांच्या बाजूने बामसेफने याबाबत सविस्तर खुलासा देत ज्या दोन व्यक्तींनी हे पत्र व्हायरल केले आहे त्यांना यापूर्वीच वामन मेश्राम यांनी पक्षविरोधी कृतीबद्दल निलंबित करून पक्षातून काढून टाकले असल्याचे म्हटले आहे.


बामसेफचे नेते वामन मेश्राम यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या पत्रामुळे बामसेफसोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.


व्हायरल होणाऱ्या पत्रात म्हटले आहे की, “२८ मे २०२२ रोजी लायन्स क्लब धर्मशाळा, हिमाचल प्रदेश येथे झालेल्या जनरल बॉडी मिटिंगमध्ये आपण उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याविषयी आपणास पत्र पाठविण्यात आले होते. मात्र, आपण आपली बाजू मांडण्यासाठी मिटींगला उपस्थित नाही राहिलात. जनरल बॉडी मिटिंगमध्ये प्रस्ताव क्र. ०२ द्वारे उपस्थित सर्व जनरल बॉडी सदस्यांनी आपले बामसेफचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव केला आहे. त्यानुसार आपण बामसेफचे प्राथमिक सदस्य नाही आहात.”


या पत्राच्या प्रति रजिस्ट्रार ऑफ सोसायटी गवरनेट ऑफ एनसीटी दिल्ली, बामसेफचे सर्व सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी, सहयोगी संघटनांचे सर्व सदस्य, कार्यकर्ते यांना पाठविण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. ६ जून २०२२ रोजी हे पत्र प्रसिद्ध केल्याचे पत्रावरील तारखेवरून दिसत आहे.


दरम्यान, बामसेफच्या वतीने मीडिया प्रभारी यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “बामसेफ ही संघटना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वामन मेश्राम ह्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करीत आहे. संघटनेचे जाळे 567 जिल्ह्यात 4500 तहसील आणि 3 लाख गावात आहे. बहुजन समाजातील 4500 ते 5000 जातीच्या लोकांनी वामन मेश्राम ह्यांचे नेतृत्व आजवर मानले आहे. ते आजही बामसेफ राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. वस्तुतः हा कमलाकांत काळे असामाजिक प्रवृत्तीचा आणि विकृत झाला आहे. संघटनेत राहून संघटन विरोधी कारवाया करताना पकडल्या गेला आहे. त्यामुळे ह्याला राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम ह्यांच्या स्वाक्षरीने बामसेफ संघटनेच्या जा.क्र ./ बामसेफ / सचिवालय / निर्देश / 598 / 2022 दिनांक 05.04.2022 च्या पत्राद्वारे प्राथमिक सदस्यतेपासून बडतर्फ करण्यात आले आणि ह्या कमलाकांत काळे ला गद्दार घोषित केले आहे. बामसेफचे भूतपूर्व महासचिव भांजी राठोड ह्यांना अनुशासनहिनतेच्या आरोपामुळे जा . क्र . / बामसेफ / सचिवालय / निलंबित / 266 / 2022 दिनांक 25.02.2022 च्या पत्राद्वारे भांजी राठोड ह्यांना बामसेफच्या महासचिव जबाबदारीतून आणि प्राथमिक सदस्यापासून निलंबित करण्यात आले होते.”


“कुमार काळे आणि भांजी राठोड ह्यांना संघटनेतून बडतर्फ करण्यात आले होते. कुमार काळे ह्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव बामसेफचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व्ही. व्ही. जाधव ह्यांनी ठेवला आणि प्रस्ताव बामसेफ राष्ट्रीय उपाध्यक्ष एच. एन. रेकवाल ह्यांनी ठेवला. भांजी राठोड ह्यांच्या बडतर्फ करण्यासाठी प्रस्ताव बामसेफ राष्ट्रीय महासचिव डी. आर. ओहोळ ह्यांनी ठेवला आणि अनुमोदन CEC मेम्बर कांचनलता लांजेवार ह्यांनी केले. जयप्रकाश पासवान, श्रीकांत चिंताला, हिम्मताराम बौद्ध, चारुबेन चौहान ह्या CEC मेम्बरचा कार्यकाळ संपुष्टात येऊन 4 नवीन CEC मेम्बर घोषित करण्यात आले. ह्याचा प्रस्ताव CEC मेम्बर पिताबस शेट्टी ह्यांनी ठेवला आणि अनुमोदनकुमार नागेली ह्यांनी केले. आता हा कमलाकांत काळे स्वतः आणि काही संघटनेचे मोजके असंतुष्ट आत्मे सोबत घेऊन हिमाचल प्रदेशमधल्या पहाडावर दिनांक 27.05.2022 पासून जाऊन राष्ट्रीय मीटिंग घेतोय आणि बामसेफ राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम ह्यांना राष्ट्रीय अध्यक्ष आणि संघटनेच्या पदावरुन निलंबित करण्याचा फतवा जाहीर करतोय. हे संघटनेच्या कार्यप्रणालीच्या विरोधात आहे. ह्या सर्व घटनेला कुठलाही आधार नाही. बामसेफची राष्ट्रीय पातळीवरची मिटिंग दिनांक 11 / 12 जून 2022 ला नागपूरला मिटिंग होणार आहे. संघटनेची बदनामी करण्यासाठी कुमार काळे आणि त्यांच्या साथीदार ह्यांच्या विरोधात बामसेफचे राष्ट्रीय महासचिव डी.आर. ओहोळ ह्यांच्या स्वाक्षरीने कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.”


वामन मेश्राम यांचे कार्य

वामन मेश्राम यांचा जन्म १९३८ मध्ये महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यामध्ये असलेल्या रामगाव गावात झाला. त्यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षण दारव्हा येथे घेतले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी औरंगाबादला गेले. १९७० दशकाच्या उत्तरार्धात औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिकत असताना वामन मेश्राम यांनी सार्वजनिक जीवनात सामील होण्याचा विचार सुरू केला. १९७५ मध्ये मेश्राम बीएएमसीईएफमध्ये दाखल झाले.


त्यांनी बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुलनिवासी संघ, राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, बहुजन क्रांती मोर्चा या संघटनांची स्थापना केली.


मेश्राम यांनी मागील ४० ते ४५ वर्षांपासून भारत देशातील ३१ राज्ये, ५७६ जिल्ह्ये, दीड लाखांहून अधिक गावांमध्ये संघटन बांधले आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग देश व विदेशात आहे. त्यांनी तीनवेळा भारत बंद यशस्वी केला आहे. २०० पोइंट रोस्टर लागू करण्याचे श्रेय मेश्राम यांना जाते. मेश्राम यांनी एनआरसी सीएच्या कायद्याला कडाडून विरोध करून हा जुलमी कायदा लागू करण्यापासून रोखले. ओबीसी, मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी बहुजन क्रांती मोर्चे राज्यभरात काढले. १९३१ सालापासून आजतागायत ओबीसी जणगणना झाली नाही.


ही जनगणना व्हावी यासाठी मेश्राम यांनी काही दिवसांपूर्वीच भारत बंद घडवून आणला. त्याची दखल देशपातळीवर घेण्यात आली. दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ओबीसी जनगणना व्हायला हवी असे मत मांडले आहे. विविध राज्यात आता हा प्रश्न चांगलाच पेटताना दिसत आहे.


लोकप्रिय नेता

वामन मेश्राम यांनी लाखो बहुजन बांधवाना प्रबोधित केले. त्यांना आपण इथले मूलनिवासी असल्याची जाणीव करून दिली. मेश्राम यांच्या सभांना लाखांच्या पटीत गर्दी असते. त्यांचे संघटन कौशल्य अफाट आहे.


वामन मेश्राम साहेब यांना संघटनेतून काढल्याचे पत्र काढणाऱ्या लोकांना कितीजण ओळखतात हा संशोधनाचा विषय आहे. या कृतिचा मी तीव्र निषेध करतो. वामन मेश्राम साहेब यांचा देशभरात असलेला प्रभाव आणि व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची धमक पाहून घाबरलेल्या जातीयवादी लोकांनी संघटनेतील लोकांना हाताशी धरून केलेले हे कृत्य असावे. वामन मेश्राम साहेब यांच्यावर आरोप करणे हे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. देशभरातील लोक पोटाला चिमटा काढून पै पै जमा करून वामन मेश्राम साहेब यांच्या लढ्याला आर्थिक मदत देतात. नेत्यावर विश्वास असल्याशिवाय हे घडत नाही. वामन मेश्राम साहेब यांच्यावर लावलेले आरोप व पत्रक काढून केलेली कृती याचा मी निषेध करतो. – श्रीकांत होवाळ (प्रदेशाध्यक्ष- बहुजन मुक्ती पार्टी, महाराष्ट्र)

वामन मेश्राम हे सर्वमान्य, समाजमान्य नेतृत्व आहे. त्यांच्या कामाची कोणालाही सर येणार नाही. स्वत:चे आयुष्य फुले – शाहू – आंबेडकरी चळवळीला समर्पित करणाऱ्या नेत्यावर असे शिंतोडे उडविणे म्हणजे समाजमान्य नेतृत्वाचा अपमान करण्यासारखे आहे. देश बंद करण्याची धमक असलेल्या नेत्याला अशा प्रकारे बदनाम करणे हे चळवळीसाठी घातक आहे. मेश्राम यांची वाढत असलेली ताकद प्रस्थापितांना धडकी भरवणारी आहे. त्यांचे कार्य जातीयवादी विचारधारेला आव्हान देणारे आहे. त्यामुळेच घरभेद्याना हेरून हा कुटील डाव खेळला जात नसल्याचे या घटनेवरून दिसून येते. – बापूसाहेब ठोकळे (बहुजन क्रांती मोर्चा,  संयोजक सांगोला)

Post a Comment

0 Comments