सांगोल्यात सीसीटीव्ही कॅमेर्यांची करडी नजर बंद
सांगोला : सांगोला शहर आणि तालुक्यात अपवादात्मक परिस्थिती वगळता दररोज छोट्या-मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत. यापूर्वी झालेल्या चोर्यांचा तपास लागण्यापूर्वीच पुन्हा चोरी घडत असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सांगोला शहर व तालुक्यात चोरीच्या घटना वाढत असताना चोरी रोखण्यासाठी प्रामुख्याने शहर आणि तालुक्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, कारण सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास चोरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे पोलिस प्रशासनाने पुढाकार घेऊन शहरातील नादुरुस्त असलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करून घ्यावेत तर तालुक्यात पोलिस पाटील व सरपंच यांच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे अवाहन करावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
सांगोला शहरात कायदा व सुव्यस्था अबाधित राहवी, चोरीला व गुन्हेगारीला आळा बसावा व वाहतुकीवर नियंत्रण रहावे व शहरातील शांतता अबाधित रहावी. या हेतुने रोटरी क्लब, सांगोला पोलिस स्टेशन, व्यापारी व लोकसहभागाच्या माध्यमातुन लाखो रुपये खर्चुन बसविण्यात आलेल्या काही सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये बिघाड झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सांगोला पोलिस स्टेशन कडुन शहरातील रोटरी क्लब व नागरीकांच्या सहकार्यातून प्रमुख चौक व वर्दळीच्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तर सांगोला बसस्थानकाच्या उजवीकडील बाजुस व वासुद चौकाच्या समोर पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. शहरात मुख्य चौकात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यामुळे पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहचण्यासाठी यापूर्वी चांगली मदत मिळाली आहे.
तसेच कॅमेर्यांच्या निगराणीमुळे अनेक गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये पोलिसांना यश देखील मिळाले आहे. परिणामी शहरातील गुन्हेगारीला वचक बसणार असे चित्र निर्माण झाल्याने नागरीकांनी सुटकेचा निश्वास घेतला होता. तसेच अपुर्या कर्मचार्यांच्या संख्याबळावर शहरांमध्ये पोलिसांना नियंत्रण ठेवणे सहजपणे शक्य होते.
लाखो रुपये खर्च करुन बसविण्यात आलेल्या काही सीसीटीव्ही कॅमेर्यांंतील तांत्रिक बिघाडामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था व शांतता पुन्हा ऐरणीवर येण्याच्या मार्गावर आहे. मागील काही दिवसांपासुन कॅमेर्यांची करडी नजर बंद झाल्याने शहरात प्रत्येक चौकाचौकात बोळा-बोळात अवैद्य धंदे खुलेआम सुरू आहेत. वाहतुक व्यवस्था विस्कळीत होत आहे,
भुरट्या चोर्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, अवैद्य वाळु वाहतुक यासारख्या अनेक घटना खुलेआम घडत असल्याने शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीला पुन्हा वाव मिळत आहे. याकडे पोलिसांचे सरळसरळ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. याबाबत सर्वसामान्य नागरिक तक्रार करण्यास गेल्यानंतर आमच्याकडे कोणताही पुरावा नसल्याचे सांगितले जात असल्याने याबाबत सांगोला पोलिसांनी व तालुक्यातील दानशूर व्यक्तीने पुढाकार घेऊन शहरातील बंद पडलेले काही कॅमेरे तातडीने दुरुस्त करून घ्यावेत. तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांतता ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून
होत आहे.
शहरात 8 चौकात 32 कॅमेरे
सांगोला शहरात महत्त्वाच्या आठ चौकांमध्ये 32 कॅमेरे सुरू करण्यात आले होते. यापैकी अनेक कॅमेरे नादुरुस्त आहेत. याबाबत सर्वच कॅमेरे पूर्ववत सुरू करण्यात यावेत. यासह पोलिस पाटील व सरपंच यांच्या पुढाकाराने गावामध्ये सायरण बसवण्यात आला आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले होते. यापैकी अनेक गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाहीत. यावरदेखील पोलिसांनी लक्ष घालून सदरचे कॅमेरे सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.


0 Comments