सांगोला तालुक्यात अवैध वाळू उपसा जोमात
सांगोला तालुक्यातील माण नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरीचे सत्र गेल्या अनेक दिवसांपासून बेधडकपणे सुरु आहे . माण नदी पात्रातून दिवस - रात्र वाळू उपसा जोमात सुरू असल्याने सांगोला तालुका अवेद्य वाळू धंद्यामध्ये जिल्ह्यात नंबर १ ला जाऊन पोहोचला आहे . अवैध वाळू उपसा संबंधित अनेक वाळू माफियावर गुन्हे दाखल होऊनही अवैध वाळू उपशाला चाप का बसत नाही ?
संबंधित प्रशासनाचे वसूलदार हे हप्ते घेऊन वाळू माफियांना सूट देत आहेत का ? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे . सर्वसामान्य जनतेला अंधारात ठेवून प्रशासनाचे काहीव लोकप्रतिनिधी जर अधिकारी लाचखोर झाले असतील तर तालुक्यात अवैध धंद्यांना उधाण आल्याशिवाय राहणार नाही अशी भीती नागरिकांतून व्यक्त होत आहे .
प्रशासनाचे काही अधिकारी वाळू माफियांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याने वाळूमाफियांना कोणाचीच भीती राहिलेली नाही . वाळूमाफिया हे नदीकाठच्या शेतकऱ्यावर जोर जबरदस्ती करून तेथून वाळू उपसा करत आहेत . शेतकऱ्यांनी विरोध केला असता त्याला जिवे मारण्याच्या धमक्याही देत आहेत . तसेच वाळू माफियांकडून अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या कित्येक घटना घडल्या असूनही वाळूमाफियांना गजाआड करण्याऐवजी प्रशासनाचे काही भ्रष्ट अधिकारी वाळूमाफियांना पाठीशी घालत आहेत .
लोकप्रतिनिधी व भ्रष्ट अधिकारी यांच्या आशीर्वादाने तालुक्यात वाळूमाफियांचा धंदा जोमात सुरू आहे . तरी संबंधित प्रशासनाने तालुक्यातील अवैध वाळू उपसा बंद करून वाळू माफियांना गजाआड करून शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना दिलासा द्यावा असा एकच सूर सर्वसामान्य नागरिकांतून निघत आहे .


0 Comments