तळीराम वाहनचालकांना सोलापूर पोलिसांचा दणका !
सोलापूर : तळीराम वाहन चालकांना सोलापूर पोलिसांनी मोठा दणका द्यायला सुरुवात केली असून चाळीस मद्यपी वाहनचालकांवर थेट खटले भरण्यात आले आहेत.
गेल्या काही काळापासून रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण भलतेच वाढलेले असून रोज अनेकजण अपघातात मृत्युमुखी पडत आहेत परंतु बेशिस्त वाहन चालक सुधारताना दिसत नाहीत. त्यात मद्यप्राशन करून वाहन चालविणारे तळीराम देखील मोठ्या प्रमाणात आहेत.
त्यांच्या मद्यप्राशनामुळे इतरांचे जीव जातात परंतु त्यांना याचे काहीच सोयरसुतक नसते. अशा मद्यपी वाहनचालकाच्या विरोधात सोलापूर पोलिसांनी मोहीमच उघडली असून अलीकडेच काही मद्यपी चालकांचा वाहन चालक परवानाच निलंबित करण्यात आला आहे. सोलापूर पोलीसानी अशा चालकाच्या विरोधात मोहीमच उघडली असून मुख्य चौकात पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. यात चाळीस वाहन चालक मद्यपान करून वाहन चालवीत असल्याचे दिसून आले.
स्वत:बरोबरच इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे माहित असून देखील अशा प्रकारे वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांची वाहने सोलापूर पोलिसांनी जप्त केली आहेत. सोलापूर पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी याबाबत अत्यंत कडक भूमिका घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना या कारवाईबाबत स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत.
आयुक्तांच्या आदेशानुसार मद्यप्राशन करून वाहन चालवत असलेल्या वाहन चालकाच्या विरोधात खटले दाखल करण्यात येऊ लागले आहेत. फक्त दंडात्मक कारवाई करून सोडून दिले जात नसून वाहन जप्त करून त्यांच्यावर खटले भरले जाऊ लागले आहेत. वाहनचालकांनी मद्यप्राशन करून वाहने चालवू नयेत यासाठी सोलापूर पोलिसांकडून आवाहन देखील करण्यात येत आहे.
पोलीस दिसू लागले
पोलीस आयुक्त हिरेमठ यांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कडक पावले उचलली आहेत, वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना अत्यंत सक्त सूचना दिल्या असून आठ तासांची ड्युटी प्रभावीपणे करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे आता चौकाचौकात वाहतूक पोलीस दिसू लागले आहेत.
वाहनचालकांना धसका !
वाहतुकीबाबत पोलीस अत्यंत दक्ष झाल्याने वाहन चालकांनीही धसका घेतला आहे. वाहतुकीचे नियम पाळण्याकडे त्यांचा कल वाढला असून कारवाई टाळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देखील वाहन चालक बाळगू लागले आहेत. तळीराम वाहन चालकांच्या विरोधात गुन्हे दाखल होऊ लागल्यामुळे ते देखील काहीसे सावध झाले आहेत.


0 Comments