सांगोला तालुक्यातील ट्रक तलवारीचा धाक दाखवून पळविला
सांगोला तालुक्यातील नाझरे येथील गरीब शेतकरी कुटुंबातील प्रविण अंबादास सरगर यांनी नुकताच पंधरा ते वीस दिवसांपूर्वी ट्रक विकत घेऊन वाहतूक व्यवसाय सुरू केला होता. त्यावरच तो आपल्या कुटुंबासह उदरनिर्वाह करीत होता.
सांगोला तालुक्यातील नाझरे येथील एका ट्रकचालकाचे हात पाय बांधून, तलवारीचा धाक दाखवून, मारहाण करून स्टील भरलेला ट्रक पळवून नेण्यात आला. विशेष म्हणजे हा ट्रक पंधरा दिवसांपूर्वीच खरेदी करण्यात आला होता. लघुशंका करण्यासाठी रस्त्यात थांबला असताना हा प्रसंग त्याच्यावर ओढवला. या घटनेने सांगोला तालुक्यातील वाहन चालकांत खळबळ उडाली आहे.
याबाबतचे वृत्त असे की, सांगोला तालुक्यातील नाझरे येथील गरीब शेतकरी कुटुंबातील प्रविण अंबादास सरगर यांनी नुकताच पंधरा ते वीस दिवसांपूर्वी ट्रक विकत घेऊन वाहतूक व्यवसाय सुरू केला होता. त्यावरच तो आपल्या कुटुंबासह उदरनिर्वाह करीत होता. ट्रकमध्ये स्टील भरून तो आष्टी-शेटफळ रस्त्यावरून जात असताना ट्रकच्या काचेवर आलेली ताडपत्री बाजूला करण्यासाठी तो ट्रक रस्त्याच्या बाजूला घेऊन थांबला होता. लघुशंका करीत असताना अंदाजे सहा जणांनी येवून ट्रक चालकास बंदुकीचा व तलवारीचा धाक दाखवून, हात-पाय बांधून जवळ असलेल्या उसात नेऊन टाकले.
खिशातील रोख रक्कम, मोबाईल व स्टीलने भरलेला ट्रक (क्रमांक एम एच १० z 1352) असे एकूण 13 लाख 61 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पळवून नेल्याची घटना शेटफळ परिसरात चार जून रोजी पहाटे तीनला घडली. याप्रकरणी मोहोळ पोलीस स्टेशनला सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यापूर्वीही या परिसरात सातत्याने अशा घटना घडल्या आहेत. अडवी लावणे, वाहनात बसणे, शस्त्राचा धाक दाखवणे अशा घटना घडल्या आहेत. यामुळे वाहनधारकत भीतीचे वातावरण पसरले आहे. यावेळी बोलताना ज्या ट्रक ड्रायव्हरवर हा प्रसंग गुदरला ते ट्रकचालक सरगर म्हणाले की, या प्रसंगामुळे मी घाबरलो असून माझे प्रचंड नुकसान झाले आहे. अशी वेळ माझ्यावर आली ती कोणावर येऊ नये. त्यामुळे सांगा आम्ही जगायचे कसे? असा टाहो ट्रकचालक सरगर यांनी फोडला.
पळवलेला ट्रक आढळा परंडा तालुक्यात
सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भरती, मोहोळ पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासात परंडा तालुक्यातील येणेगाव येथून 12 टन स्टीलसह ट्रक संशयित आरोपीला ताब्यात घेतले. सदरचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे करीत आहेत.


0 Comments