रेशन दुकानात आता ‘या’ वस्तूही मिळणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..
रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी आहे.. रेशन दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी ठाकरे सरकारने शेतकरी उत्पादक कंपन्यांंनी उत्पादीत केलेली फळे व भाजीपाला रेशन दुकानातून विकण्यास परवानगी दिली आहे. शासनाने यापूर्वीही अशाच काही वस्तूंची विक्री करण्यास परवानगी दिली होती. मात्र, त्यातून दुकानदारांचा फारसा लाभ झाला नाही.
रेशन दुकानांमधून सुरवातीला 6 महिने प्रायोगिक तत्वावर फळे व भाजीपाला विकला जाणार आहे. त्यात राज्य शासनाचा कोणताही हस्तक्षेप राहणार नसल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाचे अवर सचिव गजानन देशमुख यांनी या निर्णयाबाबतचा आदेश जारी केला.
आदेशात काय..?
रेशन दुकानांतून नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनीस सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सभासद शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला व फळे विक्रीसाठी प्रायोगिक तत्त्वावर परवानगी दिली आहे. दुकानदार व शेतकरी कंपनीसाठी अटी-शर्ती लागू असणार आहेत.
शेतकरी कंपनीला रेशन दुकानदारांवर कोणत्याही मालाच्या विक्रीसाठी सक्ती करता येणार नाही. परवानगी दिलेला माल, उत्पादने, वस्तूव्यतिरिक्त इतर बाबींची विक्री करता येणार नाही. संबंधित शेतकरी कंपनी व त्यांचे घाऊक व किरकोळ वितरक आणि रेशन दुकानदारांमध्येच हा व्यवहार असणार आहे..
पुणे येथील शाश्वत कृषी विकास इंडिया शेतकरी उत्पादक कंपनीला पुणे जिल्ह्यात फळे, भाजीपाला विकता येईल. तसेच नाशिकमधील फार्म फिस्ट फार्मर्स प्रोड्युसर या शेतकरी उत्पादक कंपनीला मुंबई-ठाण्यात भाजीपाला व फळ विक्री करता येणार आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे.
रेशन दुकानदार नाराज
रेशन वाटप कमी झाल्याने दुकानदारांना कमिशन वाढवून द्यावे किंवा मानधनावर नियुक्त करण्याची मागणी होत आहे. मात्र, शासन त्याकडे लक्ष न देता, पळवाटा शोधत आहे. विविध उत्पादने व वस्तू विकण्यास परवानगी दिल्याचे भासवून दुकानदारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा दिखावा करीत असल्याचा आरोप रेशन दुकानदारांनी केलाय..


0 Comments