google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पालकमंत्री बदलणे म्हणजे भाजीपाला आहे काय ?

Breaking News

पालकमंत्री बदलणे म्हणजे भाजीपाला आहे काय ?

 पालकमंत्री बदलणे म्हणजे भाजीपाला आहे काय ?

सोलापूर : पालकमंत्री बदलणे म्हणजे काय बाजारातला भाजीपाला असतो काय ? असा रोकठोक सवाल आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विचारला आहे. त्यांच्या या प्रश्नामुळे अनेकांच्या हालचालींना लगाम लागणार आहे.


मागील वर्षी उजनीचे पाणी इंदापूरला देण्याबाबत सोलापूर जिल्ह्यातून मोठा विरोध झाला होता आणि त्यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना बदलले जाणार असल्याचा वावड्या उडायला लागल्या होत्या. त्यानंतर शासनाने निर्णय बदलला आणि सोलापूर जिल्ह्यातील वादळ शांत झाले होते परंतु आता पुन्हा सोलापूर जिल्ह्यातून पालकमंत्री द्त्तामामा भरणे यांना हटविण्याची मागणी सुरु झाली आहे आणि इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिचन योजनेस पाणी देण्यास विरोध करण्यात येत आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना बदलले जाणार असल्याच्या वावड्या गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात उडू लागल्या आहेत. 


इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेबाबत पुरेशी माहिती असूनदेखील जिल्ह्यातील काही नेतेमंडळी दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका करीत आहेत. उजनीचे पाणी हे राजकारण करण्याचे एक प्रभावी माध्यम असल्यामुळे भाजप, काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी उजनीचे पाणी इंदापूर, बारामतीला जाऊ देणार नाही, उजनीच्या थेंबाला हात लावाल तर जिल्ह्यात फिरकू देणार नाही अशा प्रकारचे इशारे दिले परंतु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अन्य काही मंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सोलापूरच्या हक्काच्या पाण्याला कुणीही धक्का लावत नसून पूर्वी झालेल्या वाटपानुसारच इंदापूरला पाणी दिले जात आहे. लाकडी निंबोडी योजना खूप जुनी आहे असे स्पष्टपणे सांगितले गेले आहे तरी देखील सोलापूर जिल्ह्यात वातावरण दुषित होताना दिसत आहे. 


सोलापूर जिल्ह्यातून अनेक नेत्यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना इशारे दिले शिवाय राष्ट्रवादीचेच काही पदाधिकारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले आणि लवकरच जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले जाणार असल्याचे जिल्ह्यात सांगण्यात आले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे नवे पालकमंत्री होतील असा कयास देखील लावण्यात आला परंतु प्रत्यक्षात असे काही घडताना दिसत नाही उलट आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे  यांनी अत्यंत तिखटपणे यावर उत्तर दिले आहे. जिल्ह्यातून सतत टीका केली जात असतानाही भरणे हे शांतच होते आणि सोलापूर जिल्ह्याकडे फिरकलेही नव्हते पण आज मात्र सोलापुरात येवून त्यांनी चपराक लगावली आहे. 


भाजीपाला आहे काय ?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित आयोजित कार्यक्रमासाठी भरणे मामा आज सोलापुरात आले होते यावेळी पालकमंत्री बदलाबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता पालकमंत्री भरणेमामा म्हणाले, "पालकमंत्री बदलणे म्हणजे काय बाजारातील भाजीपाला असतो का "?  एका प्रतिप्रश्नावर भरणेमामांनी हा विषय संपुष्टात आणला. 


योजना जुनीच आहे !

इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी ही योजना जुनीच असून त्यामुळे उजनीचे पाणी इंदापूरला पळविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इंदापूर तालुक्यातील लोकांचे हक्काचे पाणी इंदापूरकराना देत आहोत. सोलापूर जिल्ह्यातील लोकांचा गैरसमज झाला असून तो दूर करण्याची गरज आहे. सोलापूरकरांच्या पाणीप्रश्नासाठी देखील आपण कटिबध्द आहोत" असेही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments