दिवसा नागाला मारले, रात्री नागीण येऊन चावली !
बुधनी : नागाला मारल्यानंतर नागीण त्याचा बदला घेते असे अनेकादा हिंदी चित्रपटात दाखवले जाते. नाग अथवा नागीण बदला घेते असा आजही अनेकांचा गैरसमज आहे परंतु चित्रपट दाखवतात त्याप्रमाणे प्रत्यक्षात घडले असल्याने अनेकजण आचंबित झाले आहेत.
नाग नागीण जोडीदाराच्या मृत्यूचा बदला घेतात, नागाची हत्या करणाऱ्याचा फोटो नगीण आपल्या डोळ्यात साठवते आणि नंतर त्याला शोधात दंश करून बदला घेते असे अनेक समज रूढ झाले आहेत. साप, नाग, नागीण असा कुठलाही बदला घेत नसते याबाबत अभ्यासकांनी वेळोवेळी सांगितले आहे पण तरीही अजूनही अनेकांच्या मनात ही अंधश्रद्धा घर करून बसलेल्या आहेत. आणि त्याला पुष्टी देणारी एक घटना घडली असून या घटनेची चर्चा देशभर होऊ लागली आहे.
नागाला मारल्यानंतर त्याच कुटुंबाच्या घरात रात्री नागीण आली आणि एका मुलाला दंश केल्यामुळे ही घटना अधिक चर्चेची झाली आहे. या घटनेमुळे बदला घेण्यासाठीच नागीण आली असा अनेकांचा समज झाला आहे.
मध्य प्रदेशातील जोशीपूर गावात चैत्र नवरात्रीचा जावरा पूजा कार्यक्रम सुरु असून एका तरुणाला त्याच्या घराजवळ एक नाग दिसला. किशोरी लाल आणि त्याच्या कुटुंबीयांनी या नागाला मारून टाकले आणि फेकून दिले.
त्यानंतर पुन्हा पूजा सुरु झाली आणि या कुटुंबीयांनी पूजा केली. नागाला मारून टाकल्याची घटना त्यांच्या दृष्टीने फार काही विशेष ठरली नाही. नेहमीप्रमाणे हे कुटुंब रात्री झोपी गेले. दरम्यान रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक नागीण त्यांच्या घरात घुसली आणि झोपलेल्या रोहित नावाच्या मुलाला दंश केला. दंश होताच रोहित जागा झाला आणि आरडाओरडा सुरु केला. त्याच्या आवाजाने कुटुंबीय जागे झाले. एकूण प्रकार पाहून कुटुंबीय भलतेच घाबरून गेले.
रोहितला दंश केल्याचे पाहून घरातील सर्वांनाच धक्का बसला होता. दरम्यान त्यांनी त्या दंश करणाऱ्या सापाला देखील मारून टाकले आणि रोहितला रुग्णालयात हलविण्यात आले. होशिंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले परंतु रोहितची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला भोपाळ येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. परंतु रस्त्यातच रोहितचा मृत्यू झाला. या घटनेची परिसरात मोठी चर्चा होत असून बदल्याच्या भावनेने हा प्रकार घडल्याचा अनेकांचा गैरसमज झाला आहे.


0 Comments