जात पडताळणीतील बोगसगिरी बंद होणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..!
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांत जात प्रमाणपत्र पडताळणीत ‘मॅन्युअल’ हस्तक्षेप होत असल्याने फसवणूक नि बनावटगिरी वाढल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आता मोठा निर्णय घेतला आहे..
महाराष्ट्र सरकारने गुरुवारी (ता. 7) जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी एक खास प्रणाली वापरण्यास सुरुवात केलीय. ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित ही प्रणाली आहे. ‘डिजिटल इंडिया’ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या काही भागात ‘ब्लॉकचेन’वर आधारित जात प्रमाणपत्रे देण्यास सुरुवात झाली आहे..
‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचा फायदा..
फसव्या जात प्रमाणपत्रामुळे अनेकदा पात्र व्यक्ती नोकरी वा शिक्षणाच्या संधीपासून वंचित राहतात. ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानामुळे राज्य सरकार आता जात प्रमाणपत्रांशी संबंधित सर्व आवश्यक तपशील नोंदवणार आहे. प्रमाणपत्र जारी केल्यानंतर, ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचा वापर करून हा डेटा क्यूआर (QR) कोडच्या स्वरूपात जतन केला जाईल.
भविष्यात काही अडचण निर्माण झाल्यास कोणताही सरकारी विभाग संबंधिता उमेदवाराचा ‘क्यूआर’ कोड स्कॅन करुन त्याचे जात प्रमाणपत्र तपासू शकतो.. ‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी’चे ‘सीईओ’ दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी ही माहिती दिली.
राज्यात अशी पॉलिगॉन आधारित 65,000 जात प्रमाणपत्रे जारी केली जाणार आहेत. त्यामुळे दुर्बल घटकांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचण्यास मदत होईल. फसवणुकीचे प्रकार कमी होऊन, योग्य लाभार्थ्यांची ओळख पटवण्यास मदत होईल.
गडचिरोली जिल्ह्यातील इटापल्ली गावातील रहिवाशांना ‘ब्लॉकचेन’वर आधारित प्लॅटफॉर्म ‘लेजिट डाॅक’ (LegitDoc)वर जात प्रमाणपत्रे जारी केली जात आहेत. त्यामुळे या प्रमाणपत्रांची त्वरित पडताळणी करता येते. इटापलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी शुभम गुप्ता यांनी ‘अशी सुविधा देशासमोर एक उदाहरण ठेवू शकते…’ असं म्हटलंय..
‘ब्लॉकचेन’ प्रणालीबाबत..
प्रत्येक व्यावसायिकाकडे जशी सगळा हिशेब ठेवण्यासाठी खातेवही असते, तशाच प्रकारे ‘ब्लॉकचेन’ प्रणाली म्हणजे, एक प्रकारे ‘डिजिटल’ खातेवहीच आहे. या प्रणालीमुळे तुमची माहिती ‘डिजिटल’ स्वरुपात एका ठिकाणी साठवून ठेवता येते. ही एक अत्यंत नावीन्यपूर्ण, अत्याधुनिक पद्धत आहे. विशेषत: आर्थिक व्यवहारात ही पद्धत वापरली जाते..


0 Comments