ना. छगन भुजबळ गुरुवारी सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर - मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील
Solapur : ना. छगन भुजबळ गुरुवारी सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर - मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील महुद येथे शेतकरी परिषदेत जिल्ह्यातील डाळिंब उत्पादकांच्या प्रश्नांवर होणार विचारमंथन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. ना. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. 7 एप्रिल 2022) सायंकाळी महुद बु. ता. सांगोला येथे शेतकरी परिषद होत आहे.
यावेळी सांगोला तालुक्यातील उद्ध्वस्त झालेल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचारमंथन करण्यात येणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मैदानावर सायं. 5 वा. हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी माहिती दिली.
महुद ता.सांगोला या गावाने लोकसहभागातून राष्ट्रीय जल पुरस्कार मिळवला आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांचे मार्गदर्शन महुदकरांना जलक्रांतीसाठी मिळाले आहे. जलक्रांतीमध्ये योगदान दिल्याबद्दल
श्री. भुजबळ हे महुद ग्रामस्थांचे गुरुवारी आयोजित शेतकरी परिषदेत कौतुक करणार आहेत. शेतकरी परिषदेसाठी सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे-पाटील, युवा नेते डॉ बाबासाहेब देशमुख आदीसह डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
डाळिंब पंढरी म्हणून सांगोला तालुक्याची देशाच्या नकाशावर ओळख झाली होती. परंतु, वेगाने वाढत चाललेला पिन होल बोरर, तेल्या, मर या रोगांसह नैसर्गिक आपत्तीमुळे डाळिंब पंढरी उध्वस्त झाली आहे. सांगोला तालुक्यातील डाळिंबाच्या बागा निम्म्याहून अधिक कमी झाल्या आहेत. त्यामुळे डाळिंब पंढरीचे उत्पादन वर्षाला 3 हजार कोटी रुपयांवरून यंदा 800 कोटींपर्यंत कमी झाले.
पुढील वर्षी 400 कोटी मिळेल की नाही? असा गंभीर प्रश्न तयार झाला आहे. अशा कठीण काळात डाळिंब पंढरी पुन्हा उभी रहावी म्हणून डाळिंब उत्पादकांची बाजू लावून धरनार व यासाठी शेतकरी परिषदेत नाम. छगन भुजबळ यांना साकडे घालून संगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी भरीव निधी व विशेष पॅकेज मिळावे अशी विनंती
श्री भुजबळ यांना करणार असल्याचे मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले. तरी महुद येथील आयोजित शेतकरी परिषदेस सांगोला तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.
....
चौकट
1) अभिनेते चिन्मय उदगीरकर यांची उपस्थिती
शेतकरी परिषदेसाठी अभिनेते चिन्मय उदगीरकर हे उपस्थित राहणार आहेत. समग्र ग्रामविकासात ब्रँड अमबेसिडर म्हणून चिन्मय यांनी योगदान देण्यास सुरुवात केली आहे. डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत असताना त्यांना भेटून प्रश्न समजून घेण्यासाठी आपण शेतकरी परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे चिन्मय यांनी म्हटले आहे.


0 Comments