google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुका आमसभेतील आमदार शहाजी पाटील यांच्या भाषणाची रंगली चर्चा मोदींची सभा झाली तर श्रीकांत देशमुखही आमदार होतील : शहाजी पाटलांची गुगली!

Breaking News

सांगोला तालुका आमसभेतील आमदार शहाजी पाटील यांच्या भाषणाची रंगली चर्चा मोदींची सभा झाली तर श्रीकांत देशमुखही आमदार होतील : शहाजी पाटलांची गुगली!

 सांगोला तालुका आमसभेतील आमदार शहाजी पाटील यांच्या भाषणाची रंगली चर्चा


मोदींची सभा झाली तर श्रीकांत देशमुखही आमदार होतील : शहाजी पाटलांची गुगली!


सांगोला (जि. सोलापूर) : सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील  आपल्या मोकळ्या-ढोकळ्या स्वभावाने नेहमीच चर्चेत असतात. सांगोल्याच्या आमसभेतील भाषण सध्या गाजत आहे. त्यात त्यांनी ‘मी आज सांगोल्याचा आमदार आहे. पुढच्या पंचवार्षिकला असेलच असे सांगता येत नाही. यापुढे बाबासाहेब देशमुख, दीपक साळुंखेही आमदार होतील. पंतप्रधान मोदींची एखादी सभा झाली तर श्रीकांतदादाही आमदार होतील,’ असे भाष्य केले आहे. 


सांगोल्याची आमसभा नुकतीच झाली. या आमसभेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, भाजप, रिपब्लिकन व इतर पक्षांतील नेतेमंडळी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या आमसभेत शहाजी पाटील बोलत होते. त्यात त्यांनी ‘आमदार कोणीही होईल; परंतु तुम्ही आपापसांत हेवेदावे, भांडण-तंटे करू नका. आमदार कोणीही होऊ द्या. आपली कामे करून घ्या आणि गाव विकासाठी एकत्रित राहा,’ असे आवाहन केले. कामे करताना अधिकाऱ्यांना दिलेल्या सल्ल्यांची चांगली चर्चा रंगली होती. 


शेतकरी कामगार पक्षाचे आमदार (स्व) गणपतराव देशमुख यांच्यावर मी अनेकदा वैचारिक हल्ले केले. पण, आमच्यात राजकीय हेवेदावे कधीही नव्हते. सांगोला तालुक्याला मोठा राजकीय वारसा आहे. गणपतराव देशमुख, दीपक साळुंखे आणि मी अनेक निवडणुका लढविल्या आहेत. सध्या मी आमदार आहे. पुढच्या पंचवार्षिकला असेलच असे काही नाही. तालुक्यात कोणीही आमदार होईल. परंतु नागरिकांनी पक्षद्वेश, राजकीय हाणामारी बाजूला ठेवून एकोप्याने राहावे. 


राजकारण हे निवडणुकांपुरते ठेवून इतर वेळी सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, असा सल्लाही आमदार शहाजी पाटील यांनी दिला. सामान्यांची कामे करून घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही नेत्याकडे जावा आणि कोणी केले नाही तर शेवटी माझ्याकडे या. मी त्यासाठी तयार आहे. कुठे गेला होता; म्हणून विचारणारही नाही, असे आमदार पाटील यांनी नमूद करताच आमसभेत एकच हशा पिकला.


सांगोला तालुक्यात ज्येष्ठ नेते (स्व.) गणपतराव देशमुख, (स्व.) माजी आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांचे स्मारक उभा करण्यासाठी बनविण्यात येणाऱ्या समितीचा अध्यक्ष होण्याची माझी तयारी आहे. त्यामुळे गणपतराव देशमुख आणि काकासाहेब साळुंखे-पाटील यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.


आमसभेत अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारींचा पाढाच वाचला. यावेळी अनेक विभागाच्या, विविध प्रश्नांचे ठरावही घेण्यात आले. पण, आमसभेमधील झालेल्या ठरावाबाबत उपायोजना किंवा काहीतरी कार्यवाही व्हावी, असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले. आमसभेसाठी तहसीलदारांसह अनेक अधिकारी अनुपस्थित होते. सुमारे तीन वर्षांनंतर आमसभा होत आहे आणि त्या सभेलाही विभागप्रमुख अनुपस्थित राहिल्याने राजकीय नेतेमंडळींसह नागरिकांनी संताप व्यक्त केला. गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही काही नागरिकांनी यावेळी केली.

Post a Comment

0 Comments