वकिल गुणवंत सदावर्ते राजकारणाचा बळी ठरले का...?
गुणरत्न सदावर्ते राजकीय खेळीचे बळी ठरले का ? वकील म्हणून त्यांची भूमिका योग्य होती का ? वाचा आणि विचार करा !
गुणरत्न सदावर्ते हे अतिशय हुशार वकील आहेत यात शंका नाही. वकिलाचे काम न्यायालयात आपल्या अशीलाची योग्य कायदेशीर बाजू मांडून त्याला न्याय मिळवून देणे हे त्याचे कर्तव्य. कारण आपल्या देशात आतंकवादींची बाजू सुद्धा वकिलांनी मांडली असल्याचे आपणास माहित आहे आणि तो त्यांचा मुलभूत हक्क सुद्धा आहे. गुणवंत सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात प्रभावीपणे मांडली यात शंका नाही.
मात्र त्यांनी जी वैयक्तिक टीका ज्येष्ठ नेते शरद पवार, अनिल परब, दिलीप वळसे पाटील आदींबद्दल न्यायालयात युक्तिवाद करण्याऐवजी मिडिया समोर स्वत:च्या व्यक्तिमत्वाला अशोभनीय व एखाद्या खालच्या दर्ज्याच्या राजकीय पुढाऱ्यालाही शोभणार नाही असे अपमानास्पद बोलणे हे कितपत योग्य होते ? याचे समर्थन सुज्ञ व्यक्ती कदापीही करणार नाही. (तश्या व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत). आजकाल देशाच्या प्रत्येक घडमोडी मागे करता करविता वेगळाच असतो, बळी पडतो तो एखादा निर्दोष व्यक्ती.
मग तो ED चा गैरवापर असो की एसटी कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास उद्युक्त करणारे असोत. या दुखवट्याच्या नावाखाली झालेल्या संपामागे करता करविता कोण होता ? जो एसटी कर्मचाऱ्यांना प्यादे बनवून महामंडळाच्या पर्यायाने देशाच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरला. या राजकीय खेळात मात्र गोरगरीब प्रवासी व एसटी कर्मचारी नाहक भरडले गेले व जात आहेत.
यात एसटी कर्मचाऱ्यांचे किती नाहक बळी गेले ? किती सामान्य नागरिकांना आपली ऐपत नसतांनाही अत्यावश्यक कामासाठी अव्वाच्यासव्वा भाडे मोजून खाजगी वाहनावर खर्च करून प्रवास करावा लागला ? संपकाळात संपकरीच्या कुटुंबीयांवर काय बितली ? गुणरत्न सदावर्ते यांना झालेली अटक सुद्धा ह्याचेच फलीत नाही का ? या सर्व गोष्टींचा विचार करण्यास कोणालाही वेळ नाही किंबहुना कोणाच्याही मुखाद्वारे माणुसकी झळकली नाही.
ओकली ती गरळच ! संपाद्वारे कर्मचाऱ्यांच्या पदरी काय पडले याचा सुद्धा गहन विचार करणे आवश्यक आहे. या गोष्टीचा परिणाम म्हणजे गुणरत्न सदावर्ते हे पोलीस चौकशीच्या जाळ्यात अडकले ! त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. केंद्राद्वारे ED चा केला जाणारा दुरुपयोग पाहता राज्य सरकारचे हे पाउल क्रियेला प्रतिक्रिया असेच समजावे लागेल. ‘आपलं ते बाळ, दुसऱ्याचं ते कारटं’ असा प्रकार चालला आहे.
आम्ही ED लावली ती योग्य, मात्र व्हायरल झालेल्या व्यातीगत टीकेचे व्हिडिओ परिणामी शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला योग्य आहे का ? पोलिसांची कारवाई अयोग्य आहे का ? असाही प्रश्न पडतो. दरम्यान पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी पवार कुटुंबीय आणि दिलीप वळसे पाटील यांच्या पासून गुणरत्न सदावर्ते यांच्या जीवितास धोका असल्याचे मीडियाशी बोलतांना सांगितले.
तसेच माझ्या पतीला भेटू देत नाही, त्यांना अतिरेकी सारखी वागणूक देत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. पवार हे आपल्या ताकदीचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. दरम्यान एसटी कर्मचारी कारण नसताना काही महिने संपावर राहिला आणि त्यामुळे आर्थिक संकट त्यांच्या कुटुंबावर आले त्यासाठी काहींना आत्महत्या करण्याची टोकाची भूमिका सुद्धा घ्यावी लागली.
त्याबद्दल संपला पाठींबा देणारे किंवा विरोधक कहीही बोलण्यास तयार नाहीत. त्यावर जे नेतृत्व अतिटोकाची भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण करते तेच नेतृत्व आत्महत्या किंवा तत्सम गोष्टींना जबाबदार आहे असा थेट आरोप करतांनाच त्याच्यातून जे काही नैराश्य आले ते नैराश्य कुठेतरी काढलं पाहिजे म्हणून याठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला बाकी त्याच्यामध्ये दुसरं काही नाही
अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. या लेखाद्वारे पुनश्च सुज्ञ देशवासियांना कळकळीची विनंती की राजकीय खेळीचे प्यादे न होता आपल्या कृतीतून देशाला काही नुकसान तर होत नाही ना ? हा विचार कुठलेही पाउल उचलण्यापूर्वी करून प्रथम देश आणि मग इतर सर्व गोष्टी ! याचे भान ठेवल्यास देशात शांतता नांदेल याची खात्री आहे.


0 Comments