‘बुस्टर डोस’ मोफत मिळणार का..? डोससाठी नोंदणी प्रक्रिया कशी असणार..?
भारतात कोरोना संसर्ग बऱ्यापैकी कमी झालेला असून, या आजाराचा समूळ नाश करण्यासाठी मोदी सरकारने शुक्रवारी (ता. 8) मोठा निर्णय जाहीर केला. तो म्हणजे, येत्या 10 एप्रिलपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोराेना प्रतिबंधात्मक लसीचा तिसरा बुस्टर डोस देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने याआधी फक्त आरोग्य कर्मचारी व 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांनाच ‘बूस्टर डोस’साठी मंजुरी दिली होती. मात्र, आता 18 वर्षांवरील सरसकट नागरिकांना हा ‘प्रिकॉशन’ डोस दिला जाणार आहे.. कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे..
दरम्यान, याआधी नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मोफत देण्यात आले होते. त्यासाठी केंद्र सरकारने खास निधीची तरतूद केली होती. आता केंद्र सरकारने बुस्टर डोस देण्यास मान्यता दिली असली, तरी ते मोफत देणार की त्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागणार, तसेच हा डोस घेण्यासाठी नागरिकांना काय करावं लागणार, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
डोस मोफत मिळणार का..?
केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 18 वर्षांवरील ज्या नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत, असे नागरिक बुस्टर डोससाठी पात्र असतील. हा डोस सध्या खासगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलंय.
म्हणजेच, कोरोना लशीचा ‘प्रिकॉशन’ डोस फ्री मिळणार नाही. त्यासाठी नागरिकांना आता पैसे मोजावे लागणार आहेत. पुण्याच्या ‘सीरम इन्सिट्यूट’ने आपल्या कोविशिल्ड लशीची किंमत जारी केली आहे. ‘कोविशिल्ड’चा बुस्टर डोस घेण्यासाठी 600 रुपये लागणार आहेत.
दरम्यान, कोरोना लसीचा पहिला व दुसरा डोस पूर्वीप्रमाणे नागरिकांना मोफतच मिळणार आहेत. तसेच आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी आणि 60 हून अधिक वर्षांच्या नागरिकांनाही देण्यात येणारा ‘बुस्टर डोस’ पूर्वीप्रमाणेच मोफत दिला जाईल. त्यासाठी सरकारी लसीकरण केंद्रांद्वारे सुरू असलेला मोफत लसीकरण कार्यक्रम सुरू राहील, त्याला अधिक गती दिली जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली..
‘बुस्टर डोस’साठी नोंदणी प्रक्रिया
बुस्टर डोस घेण्यासाठी सर्वप्रथम https://selfregistration.cowin.gov.in/ या संकेतस्थळावर ‘लॉग इन’ करा.
पहिल्या व दुसऱ्या डोसच्या बुकिंग करताना दिलेला मोबाइल नंबर प्रविष्ट करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल.
तुम्हाला पहिल्या दोन डोसचे तपशील, तसेच, प्रिकाॅशन डोस टॅब दिसेल. बूस्टर डोससाठी किती दिवस शिल्लक आहेत, देय तारीख दिसेल.
नंतर ‘अपॉईंटमेंट बूक’ करण्यासाठी ‘शेड्युल प्रिकाॅशन डोस’ टॅबवर क्लिक करा.
पिनकोड वापरून किंवा जिल्हा आणि राज्य निवडून लसीकरण केंद्र शोधा. केंद्र नि वेळेचा स्लॉट निवडा.
स्लॉट यशस्वीरित्या बूक केल्यावर त्याचे तपशील स्क्रीनवर दिसतील.
अपॉइंटमेंट बूक झाल्याचा मेसेज येईल. सोबत एक ओटीपी येईल. तो खासगी लसीकरण केंद्रात दाखवून बुस्टर डोस घ्यावा..!


0 Comments